CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची संख्या २४ लाखांहून अधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:49 IST2020-08-15T03:16:04+5:302020-08-15T06:49:43+5:30
६४ हजारांहून अधिक नवे रुग्ण : बरे झालेल्यांचे प्रमाण ७१ टक्के

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची संख्या २४ लाखांहून अधिक
नवी दिल्ली : देशात शुक्रवारी कोरोनाचे ६४,५५३ नवे रुग्ण आढळले असून, त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २४ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यात दिलासा देणारी बाब ही की, या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या आता १७ लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे आणखी १००७ जण मरण पावल्याने बळींची एकूण संख्या ४८,०४० झाली आहे.
देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४,६१, १९० असून, पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १७,५१,५५५ इतकी आहे. बरे झालेल्या व्यक्तींचे प्रमाण ७१.१७ टक्के झाले आहे, तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.९५ टक्के राखण्यात सरकारी यंत्रणांना यश आले आहे.
देशात सध्या ६ लाख ६० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाने कोरोना रुग्णांचा २० लाखांचा टप्पा ७ ऑगस्ट रोजी ओलांडला होता.
कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ५,३९७, दिल्लीत ४,१६७, कर्नाटकात ३,१६३, गुजरातमध्ये २,७३१, आंध्र प्रदेशमध्ये २,३७८, उत्तर प्रदेशमध्ये २,२८०, पश्चिम बंगालमध्ये २,२५९ व मध्यप्रदेशमध्ये १,०६५ इतकी आहे. अन्य काही राज्ये व कें द्रशासित प्रदेशांमध्येही कोरोनामुळे लोकांचा बळी गेला आहे. या आजारामुळे मरण पावलेल्यांपैकी ७० टक्के लोकांना एकाहून अधिक व्याधी होत्या.
कोरोना चाचण्यांची एकूण संख्या २ कोटी ७६ लाख
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ८,४८,७२८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशभरात कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता २ कोटी ७६ लाखांहून अधिक झाली आहे.
दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण १० लाखांपर्यंत नेण्याचे केंद्र्राने ठरविले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यांचे सहकार्य लाभत आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर अधिकाधिक रुग्णांना शोधून वेळीच उपचार केल्यास साथीवर नियंत्रण ठेवता येईल, असे सूत्रांनी सांगितले.