CoronaVirus News: रशियाच्या लसीला तिसऱ्या टप्प्याचे प्रयोग करण्यास प्रतिबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 01:22 IST2020-10-09T01:22:32+5:302020-10-09T01:22:49+5:30
CoronaVirus vaccine news: दुसऱ्या टप्प्याचे प्रयोग अपरिहार्य

CoronaVirus News: रशियाच्या लसीला तिसऱ्या टप्प्याचे प्रयोग करण्यास प्रतिबंध
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांच्या थेट तिसºया टप्प्याचे प्रयोग भारतात करण्याची अनुमती रशियाने मागितली होती; पण अशी परवानगी देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा आधी पार पाडा व मग पुढच्या टप्प्याकडे वळा असे रशियाला सांगण्यात आले आहे.
स्पुटनिक व्ही ही औषध नियंत्रकांची मान्यता मिळालेली जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लसीवर रशियात मोठ्या प्रमाणावर प्रयोग केलेले असल्याने तिच्या मानवी चाचण्यांचा थेट तिसरा टप्पा भारतात पार पाडण्यास परवानगी द्यावी असा अर्ज रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) व डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी केंद्र सरकारकडे केला होता. त्यावर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायेझशन (सीडीएससीओ) या केंद्र सरकारच्या संस्थेतील तज्ज्ञगटाने विचारविनीमय केला.
रशियाला स्पुटनिक-व्ही लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा आधी पार पाडावाच लागेल असे मत या तज्ज्ञगटाने व्यक्त केले. या लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा वगळण्याची सवलत रशियाला केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे आता आरडीआयएफ व डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला स्पुटनिक व्ही लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा पार पाडण्यासाठी केंद्र सरकारकडे नवा अर्ज करावा लागणार आहे.
स्पुटनिक व्ही या लसीच्या भारतात मानवी चाचण्या तसेच वितरणासाठी रशियाने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या भारतीय कंपनीशी करार केला आहे. भारताने या लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी दिली तर आरडीआयएफने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला कोरोना प्रतिबंधक लसीचे १० कोटी डोस पुरविण्याची तयारी ठेवली आहे.
सात लसींच्या चाचण्यांकडे लक्ष
26 कोरोना प्रतिबंधक लसींच्या जगभरात चाचण्या सुरू आहेत. त्यातील सात लसींच्या चाचण्या पुढच्या टप्प्यात आहेत. त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यामध्ये भारत-बायोटेक-आयसीएमआर तयार करत असलेली कोव्हॅक्सिन लस, झायडस कॅडिला बनवत असलेली लस यांचा समावेश आहे.
नोव्हॅव्हॅक्सनेही कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटशी करार केला आहे.