CoronaVirus News: "डॉ. हर्षवर्धन यांच्या किती सहकाऱ्यांनी कोरोनावर आयुर्वेदिक उपचार घेतले?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:55 IST2020-10-10T02:40:36+5:302020-10-10T06:55:57+5:30
CoronaVirus News: आयएमएचा सवाल; योग, आयुष औषधांविषयी साशंकता व्यक्त

CoronaVirus News: "डॉ. हर्षवर्धन यांच्या किती सहकाऱ्यांनी कोरोनावर आयुर्वेदिक उपचार घेतले?"
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या ज्या सहकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला त्यापैकी किती जणांनी हा आजार बरा होण्यासाठी आयुर्वेद उपचारांचा वापर केला, असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या संस्थेने केला आहे.
कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असणाºया रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेद व योगाचा उपयोग करावा. त्यासाठी अश्वगंधासहित सुमारे ६४ आयुष औषधे उपयोगी आहेत, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले होते. त्याबद्दल आयएमएचे अध्यक्ष रंजन शर्मा व सरचिटणीस आर.व्ही. अशोकन यांनी त्यांना प्रश्न विचारले आहेत. कोरोना झालेल्या मंत्र्यांपैकी किती जणांनी आयुर्वेदिक उपचार करून घेतले, असा सवालही केला आहे.
बनावट गोळ्या माथी मारू नका
आयएमएने सांगितले की, आयुष औषधांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना डॉ. हर्षवर्धन नीट उत्तरे देऊ शकले नाहीत, तर ते बनावट गोळ्या रुग्णांच्या माथी मारत आहेत, असेही म्हणावे लागेल. कोरोना बरा होण्यासाठी योग, आयुष औषधे कशी आहेत, हे ठसविण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी काही संघटनांचाही हवाला दिला आहे. कोरोना बरा होण्यासाठी जी औषधे सुचवत आहेत, त्यांच्याविषयी कोणतेही शास्त्रीय संशोधन झालेले नाही.