काशी : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन केल्याने गंगा नदी कधीनव्हे एवढी स्वच्छ झाली आहे. या काळात रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळल्यास पोलिसांच्या काठ्यांच्या प्रसादाबरोबर दंड बैठका काढणे, बेडूक उड्या मारत जाणे किंवा लोळत जाण्याची शिक्षा झाल्याचे व्हिडीओ कमालीचे व्हायरल होत होते. यानंतरही लोकांनी घराबाहेर पडणे सुरुच ठेवल्याने अखेर पोलिसांनी गुन्हे नोंदविण्यास सुरुवात केली होती.
या सर्व शिक्षा देशाच्या नागरिकांसाठी होत्या. पण परदेशी नागरिक जर रस्त्यावर किंवा इतरत्र फिरताना आढळले तर काय शिक्षा द्यायची असा प्रश्न पोलिसांना पडला होता. कारण उत्तराखंडमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर १० परदेशी नागरिक विनाकारण फिरताना आढळले होते. ऋषीकेशमध्ये हा प्रकार घडला होता.
तसे पाहता परदेशात नियम आणि कायद्यांचे कडक पालन लोकांकडूनच केले जाते. यामुळे या १० परदेशी लोकांकडून त्यांना लाजीरवाणे वाटेल आणि काठीही मोडणार नाही या प्रकारची वेगळीच शिक्षा देण्यात आली. आपल्याकडे शाळेमध्ये असताना गुरुजी अशा शिक्षा द्यायचे. या परदेशी नागरिकांकडून ''मी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले नाही, मला माफ करा'', असे वाक्य ५०० वेळा लिहून घेण्यात आले. महत्वाचे म्हणजे हे त्यांना गंगेच्या काठावरच बसून लिहायला लावले.
या फोटोंमध्ये गंगेचे निळेशार पाणी दिसत आहे.