CoronaVirus News: तिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 16:36 IST2020-05-21T16:23:16+5:302020-05-21T16:36:53+5:30
CoronaVirus News: २५ मेपासून देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू होणार; नियमावली जाहीर

CoronaVirus News: तिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज
नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे ठप्प असलेली हवाई सेवा आता हळूहळू पूर्ववत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार आहे. मात्र विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक नियम पाळावे लागतील. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी याबद्दलची माहिती आज पत्रकार परिषद घेऊन दिली.
सरकारनं विमानाचे तिकीट दर निश्चित केले आहेत. या नियमाचं पालन सर्व विमान कंपन्यांना करावं लागेल. यासोबतच सरकारनं विमान कंपन्या आणि प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली आहे. मेट्रो टू मेट्रो शहरांसाठी काही नियम असतील. मेट्रो टू नॉन मेट्रो शहरांसाठी वेगळे नियम असतील. सुरुवातीला विमानतळांचा एक तृतीयांश भाग सुरू करण्यात येईल. कोणत्याही विमानात जेवण दिलं जाणार नाही. केवळ ३३ टक्के विमानांना उड्डाणाची परवानगी असेल, अशी माहिती पुरी यांनी दिली.
विमानात प्रवास करताना दोन प्रवाशांमध्ये एक आसन सोडलं जाणार का, या प्रश्नाला अद्याप असा कोणताही नियम नसल्याचं पुरी म्हणाले. मात्र इतर नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, असं पुरींनी सांगितलं. सरकार ऑगस्टपर्यंत तिकिटांचे दर निश्चित करणार येतील. उदाहरणार्थ, दिल्ली ते मुंबई विमानाचं तिकीट किमान साडे तीन हजार ते कमाल १० हजारांपर्यंत असेल. सरकारनं घालून दिलेल्या नियमानुसारच कंपन्यांना तिकीटांचे दर निश्चित करावे लागतील. ऑगस्टपर्यंत कंपन्यांना याचं पालन करावं लागेल, असं पुरी म्हणाले.
वंदे भारत अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत २० हजार भारतीयांना परदेशातून मायदेशी आणण्यात आल्याची माहिती पुरी यांनी दिली. काही देशांमध्ये भारतीय अडकले आहेत. मात्र तिथली सरकारं अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परवानगी देत नसल्यानं अडचणी येत आहेत, असं नागरी उड्डाण मंत्र्यांनी सांगितलं.
नियम बदलले! जाणून घ्या, विमानतळ प्रशासनाच्या प्रवाशांसाठी नव्या सूचना
पीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादीच्या भित्रेपणावर 'प्रहार' करताना निलेश राणेंची चक्क शिवसेनेच्या हिमतीला दाद