Coronavirus: कोरोना लस विकत घेण्यासाठी विकसनशील देशांना १२ अब्ज डॉलर; जागतिक बँकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:48 IST2020-10-15T02:12:06+5:302020-10-15T06:48:55+5:30
World Bank News: रुग्णांच्या उपचारांसाठीही मदत करणार, कोरोना विषाणूच्या साथीला तोंड देण्यासाठी १६० अब्ज डॉलरचा निधी खर्च करण्याची जागतिक बँकेची मूळ योजना आहे.

Coronavirus: कोरोना लस विकत घेण्यासाठी विकसनशील देशांना १२ अब्ज डॉलर; जागतिक बँकेचा निर्णय
वॉशिंग्टन : कोरोना प्रतिबंधक लस विकत घेण्यासाठी, तसेच या रुग्णांवरील उपचारांसाठी जगभरातील विकसनशील देशांना १२ अब्ज डॉलरचा निधी जागतिक बँक देणार आहे. निधीचा हा निर्णय जागतिक बँकेच्या संचालक मंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला.
कोरोना विषाणूच्या साथीला तोंड देण्यासाठी १६० अब्ज डॉलरचा निधी खर्च करण्याची जागतिक बँकेची मूळ योजना आहे. त्यातील काही रक्कम विकसनशील राष्ट्रांना सध्या देण्यात येणार आहे. मदत केल्या जाणाऱ्या देशांना केवळ पैसेच नाहीत, तर अद्ययावत तंत्रज्ञानही पुरविले जाईल. त्यामुळे ते देशातच मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन करू शकतील. प्रतिबंधक लसीला मोठी मागणी येणार असून, ती पूर्ण करण्यासाठी कंपन्यांनी सज्ज असावे.कोरोना प्रतिबंधक लसीचा शोध लागला, तर त्या लसीचे जगातील सर्व देशांत समन्यायी वाटप होईल का, याविषयी विकसनशील देशांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिका, युरोप आदी देशांनीच लसीसाठी इतकी मोठी मागणी नोंदविली आहे की, इतर देशांतील कोरोनापीडित रुग्णांना ही लस लवकर मिळणे अशक्य आहे, अशी भीती आशिया, आफ्रिकातील काही देशांनी बोलून दाखविली होती. जागतिक बँकेने कोरोना लस विकत घेण्यासाठी, तसेच तिच्या वितरणासाठी १२ अब्ज डॉलरचा निधी देण्याचा जाहीर करून त्या देशांना दिलासा दिला आहे.
दोन कंपन्यांकडून चाचण्या स्थगित
- अमेरिकेतील इली लिली या औषध कंपनीने रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर करावयाच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याचे प्रयोग अज्ञात कारणामुळे स्थगित केले आहेत.
- त्याच्या काही तास आधी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपल्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्यातील प्रयोग स्थगित करण्यात आले होते.
- या प्रयोगात सहभागी झालेल्यांपैकी एक स्वयंसेवक आजारी पडला असून, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्याला नेमका काय आजार झाला आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. प्रयोग तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने सांगितले.