Coronavirus: "देशात ९९ टक्के लोकांसाठी कोरोना जीवघेणा नाही; भीतीच्या वातावरणातून बाहेर या"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 07:22 IST2020-05-09T01:17:52+5:302020-05-09T07:22:57+5:30
राहुल गांधी : स्थलांतरित कामगारांना जबरदस्तीने रोखणे चुकीचे

Coronavirus: "देशात ९९ टक्के लोकांसाठी कोरोना जीवघेणा नाही; भीतीच्या वातावरणातून बाहेर या"
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : कोरोनाची साथ देशातील ९९ टक्के लोकांसाठी जीवघेणी नाही. या रोगाबाबत लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. आम्हाला ही भीती दूर करावी लागेल. एक अथवा दोन टक्के लोकांसाठी हा रोग नक्कीच जीवघेणा आहे. ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब अथवा गंभीर आजार आहे त्यांच्यासाठी हा रोग घातक आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
राहुल गांधी यांनी दावा केला की, देशातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी भीतीच्या वातावरणातून बाहेर निघावे लागेल. कोण भाजपचे आहे, कोण काँग्रेस अथवा अन्य पक्षांचे आहे याचा विचार न करता सर्वांच्या सहकार्याने सरकारने हे भीतीचे वातावरण समाप्त करायला हवे. जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकेल. भीतीचे वातावरण समाप्त करण्यासाठी सकारात्मक भूमिका पार पाडण्याचे आवाहन त्यांनी मीडियाला केले.
राहुल गांधी म्हणाले की, कोरोनावर विजय मिळविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीयकृत मार्गाऐवजी विकेंद्रीकरणाचा मार्ग निवडावा. कारण, थेट तळागाळात धोरणे राबविण्यासाठी वस्तुस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांकडे आहे. या वस्तुस्थितीची जाणीव केंद्रातील धोरण ठरविणाऱ्यांकडे नाही. ते म्हणाले की, देशातील १३ कोटी लोकांना ७५०० रुपये दिले जावेत. जर, ते शक्य नसेल तर किमान ५००० रुपये तर त्वरित मिळायला हवेत. ही रक्कम ६५ हजार कोटींएवढी असून अशक्य नाही. रोजगार आणि अर्थव्यवस्थेसाठी एमएसएमई तथा मोठ्या उद्योगांना तात्काळ आर्थिक सहकार्य आणि क्रेडिट सुविधा देण्याचे समर्थन करताना राहुल गांधी यांनी पुरवठा साखळी पुन्हा सुरू करण्यावर जोर दिला. अन्नसुरक्षा, मनरेगा, शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये टाकण्याच्या मुद्यांचा पुनरुच्चार करताना राहुल गांधी यांनी जोर देऊन सांगितले की, स्थलांतरित कामगारांना जबरदस्तीने रोखणे चुकीचे आहे. जर ते आपल्या घरी परतू इच्छित असतील तर, त्यांना परवानगी मिळायला हवी.
लॉकडाऊनमधून बाहेर येण्याचे धोरण काय? : अमरिंदर सिंग
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यासाठी महसुलाच्या मागणीचा पुनरुच्चार करताना लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची रणनीती आणि आर्थिक पुनरुज्जीवनासाठीचे धोरण काय? अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, या साथीचा गरिबांना सर्वाधिक फटका बसला आहे. सामाजिक, आर्थिक जनजीवन लवकर पूर्ववत झाले नाही तर, समाजाचे मोठे नुकसान होईल.