coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला, आठवडाभरासाठी दिल्लीच्या सीमा बंद, केजरीवाल यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 16:58 IST2020-06-01T16:58:15+5:302020-06-01T16:58:49+5:30
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभरासाठी बंद राहणार आहे. मात्र पासच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोक ये जा करू शकतील.

coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला, आठवडाभरासाठी दिल्लीच्या सीमा बंद, केजरीवाल यांची घोषणा
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एकीकडे देश अनलॉक होऊन अनेक निर्बंध शिथिल होत असताना दिल्लीमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुढील आठवडाभरासाठी दिल्लीच्या सीमा बंद राहणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी केजरीवाल यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभरासाठी बंद राहणार आहे. मात्र पासच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोक ये जा करू शकतील. तसेच दिल्लीतील नागरिकांचा सल्ला घेतल्यानंतर आम्ही राज्याच्या सीमा उघडण्याबाबत निर्णय घेऊ, असेही केजरीवाल यांनी सांगितलेत.
केजरीवाल यांनी पुढे सांगितले की, दिल्लीमध्ये सलून उघडतील. मात्र स्पा बंद राहतील. तसेच यापूर्वी ज्या व्यवहारांना परवानगी दिली होती ती कायम राहील. तसेच रात्री कर्फ्यूच्या वेळी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सर्व लोक घरात राहतील. तसेच दुचाकीवर एकाच व्यक्तीला प्रवास करण्याची परवानगी असेल. तसेच दुकाने उघडण्यासाठीचा ऑड इव्हनचा नियम बंद करण्यात आला असून, आता सर्व दुकाने उघडतील.
दरम्यान, दिल्ली सरकारने पुढील एका आठवड्यापर्यंत दिल्लीच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरिदाबाद या शहरातून दिल्लीत येण्यासाठी प्रवेश मिळणार नाही. मात्र ज्यांच्याकडे पास असेल त्यांना अत्यावश्यक कामांसाठी दिल्लीत प्रवेश मिळेल.
आता दिल्लीच्या सीमा पुढेही बंद ठेवायच्या की काय करायचे याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सल्ला देण्याचे आवाहन दिल्लीतील नागरिकांना केले आहे.