Coronavirus: कोरोनाग्रस्तांसह ५० भारतीय शास्त्रज्ञ विमानातून मायदेशी; मध्य आशियातील देशातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 07:03 IST2020-11-30T01:29:06+5:302020-11-30T07:03:56+5:30
या शास्त्रज्ञांच्या पथकातील कोरोना रुग्णांसह सर्वांना भारतात परत आणण्याची कामगिरी भारतीय हवाई दल पार पाडू शकेल का अशी विचारणा केंद्र सरकारकडून करण्यात आली.

Coronavirus: कोरोनाग्रस्तांसह ५० भारतीय शास्त्रज्ञ विमानातून मायदेशी; मध्य आशियातील देशातील घटना
नवी दिल्ली : मध्य आशियातील एका देशात अधिकृत दौऱ्यावर गेलेल्या ५० भारतीय शास्त्रज्ञांना हवाई दलाच्या सी-१७ ग्लोबमास्टर या विशेष विमानाद्वारे मायदेशी परत आणण्यात आले आहे. यातील काही शास्त्रज्ञांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. मध्य आशियातील त्या देशाचे नाव मात्र उघड करण्यात आलेले नाही.
सूत्रांनी सांगितले की, आपल्या शास्त्रज्ञांचे पथक काही कामानिमित्त मध्य आशियातील एका देशात गेले होते. त्या देशाबरोबर भारताचा महत्वाच्या बाबींसंदर्भात एक करार झाला आहे. या पथकातील शास्त्रज्ञांपैकी काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती कळताच त्या देशातील भारतीय दूतावासाने केंद्र सरकारशी संपर्क साधला.
या शास्त्रज्ञांच्या पथकातील कोरोना रुग्णांसह सर्वांना भारतात परत आणण्याची कामगिरी भारतीय हवाई दल पार पाडू शकेल का अशी विचारणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत भारतीय हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर हे विमान संबंधित खात्यांची परवानगी घेऊन मध्य आशियातील देशात रवाना झाले व तिथून भारतीय शास्त्रज्ञांच्या पथकाला घेऊन परतले.
आगळीवेगळी मोहीम
कोरोना साथीमुळे याआधी चीनच्या वुहान शहर व जगातील अन्य काही भागांमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना हवाई दलाच्या विमानाने मायदेशात परत आणण्यात आले होते. मात्र त्यात एकही कोरोना रुग्ण नव्हता. त्यामुळे मध्य आशियातील देशातून भारतीय हवाई दलाच्या विमानाने कोरोना रुग्णांना घेऊन येण्याची प्रथमच पार पाडलेली मोहीम आगळीवेगळी ठरली आहे.