CoronaVirus: A Corona suspect patient jumps from the sixth floor to escape, but ... rkp | CoronaVirus : संभाव्य कोरोना बाधित रुग्णाने पळून जाण्यासाठी मारली सहाव्या मजल्यावरून उडी, पण...

CoronaVirus : संभाव्य कोरोना बाधित रुग्णाने पळून जाण्यासाठी मारली सहाव्या मजल्यावरून उडी, पण...

करनाल : सध्या देशावर कोरोना व्हायरसचे संकट ओढावले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. यातच सोमवारी हरयाणामधील करनालमध्ये एका संभाव्य कोरोना बाधित रुग्णाने हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

करनालमधील कल्पना चावला मेडिकल कॉलेजमध्ये १ एप्रिलला पानिपत येथील एका युवकाला दाखल करण्यात आले होते. या युवकाला ताप, अंगदुखी आणि किडणीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होते. तसेच, या युवकाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, या मेडिकल कॉलेजच्या सहाव्या मजल्यावर आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आले आहे. या वार्डमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. पण, या वार्डमधून चादरीच्या सहाय्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या तोल जाऊन खाली पडल्यामुळे मृत्यू झाला. अद्याप या युवकाचा कोरोना अहवाल आला नाही.

दरम्यान, सोमवारी पलवलमध्ये कोरोनाचे आठ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत हरयाणात कोरोना रुग्णांची संख्या ८४ वर पोहोचली आहे. याचबरोबर, हरयाणा सरकारने निर्णय घेतला आहे की, जर कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या रुग्णाचे अंतिमसंस्कार सरकार करेल. याची जबाबदारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे, देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र  सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: A Corona suspect patient jumps from the sixth floor to escape, but ... rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.