Omicron Variant: ओमायक्रॉनवर बूस्टर रामबाण इलाज? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 06:24 IST2021-12-06T06:23:47+5:302021-12-06T06:24:10+5:30
नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप (एनटीएजी) येत्या दोन आठवड्यांत ही योजना आणेल. सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी औषध महानियंत्रकांकडे मंजुरीही मागितली आहे.

Omicron Variant: ओमायक्रॉनवर बूस्टर रामबाण इलाज? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
नवी दिल्ली - भारतात शिरकाव केलेल्या ओमायक्रॉनवर लसीचा बूस्टर डोस हाच रामबाण उपाय असल्याचे सांगितले जात आहे. तूर्तास नियंत्रणात असलेल्या ओमायक्रॉनचाी संसर्गदर अधिक आहे. त्यामुळे त्याचा फैलाव झाल्यास लसींची परिणामकारकता घटण्याची शक्यता आहे. म्हणूनच बूस्टर डोसची गरज भासणार आहे.
भारतात तयारी किती?
गंभीर आजारी किंवा प्रतिकारक्षमता कमी असलेल्यांना लसीचा बूस्टर डोस देण्यासाठी केंद्र सरकार नवीन धोरण आणण्याच्या विचारात आहे. नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप (एनटीएजी) येत्या दोन आठवड्यांत ही योजना आणेल. सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी औषध महानियंत्रकांकडे मंजुरीही मागितली आहे. ४० वर्षांहून अधिक वय असलेल्यांना बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता आहे. लसीचा बूस्टर डोस देण्यासाठी अनेक देशांनी हालचाली सुरू केल्या आहेत. बहुतांश देशांमध्ये ४०हून अधिक वय असलेल्यांनाच बूस्टर डोस दिला जात आहे. काही देशांमध्ये १८ वर्षावरील लोकांनाही बूस्टर डोस दिला जात आहे.
बूस्टर डोसने कोरोना रोखला जाईल?
अनेक देशांनी बूस्टर डोस कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे.अमेरिका, इस्रायल, ब्रिटन, इटली, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान या देशांनी लसीच्या बूस्टर डोसला योग्य ठरवले आहे.आतापर्यंत तरी बूस्टर डोसमुळे गंभीर असे प्रतिकूल परिणाम झाल्याचे आढळून आलेले नाही. बूस्टर डोस घेतल्यानंतर हलकासा ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी यांसारखे त्रास जाणवण्याची शक्यता असते.