नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा वेगाने प्रसार झाला असून अनेक देश त्याला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारत बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. इतर देशांच्या तुलनेत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारताला यश आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांनाही सहाय्य करत असल्याने त्यांचं कौतुक होत आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी मोदींना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातून त्यांनी मोदींचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आता कोरोनावर मात करुन अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करायची असेल तर काय करायला हवं याबाबत बिल गेट्स यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
बिल गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमधून अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्याच्या विचारात असणाऱ्या सर्व देशांना काही सल्ले दिले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईची तुलना बिल गेट्स यांनी महायुद्धाशी केली असून या लढाईमध्ये सर्व देश एकाच बाजूने असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोरोनाच्या चाचण्यांसंदर्भात नव्या पद्धतीने विचार करणे, लस शोधणे आणि सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांच्या जोरावरच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल असंही त्यांनी नमूद केलं आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गरजेनुसार अनेक महत्त्वाचे शोध लावण्यात आले. रडार, टॉरपीड, कोड-ब्रेकिंगच्या शोधांची त्यांनी आठवण करुन दिली. या शोधांमुळे युद्ध लवकर संपले. कोरोनाशी सामना करण्यासाठी पाच मुख्य गोष्टींबद्दल विचार करणे गरजेचे आहे असं मत बिल गिट्स यांनी व्यक्त केलं. यामध्ये त्यांनी उपचार, लस, तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करणे या पाच गोष्टींसंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. या गोष्टींबद्दल योग्य निर्णय घेतले तरच परिस्थिती सुधारेल असं म्हटलं आहे.
कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून इतक्या वेगाने आतापर्यंत कधीच बेरोजगारी वाढली नव्हती. अनेक ठिकाणी कामकाज ठप्प आहेत. सर्वांनाच घराबाहेर पडण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच या आजारावर लस शोधण्याची गरज आहे. असं झाल्यास लोकांना अधिक सुरक्षित वाटेल आणि तेव्हाच ते घराबाहेर पडतील. यावर लस हा एकमेव उपाय आहे. जोपर्यंत आपल्याला लस सापडत नाही तोपर्यंत जग पूर्वीसारखे होणार नाही असं देखील बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.
जेव्हा लस सापडेल तेव्हा जगातील सर्व लोकांना म्हणजेच जवळपास 700 कोटी लोकांना ही लस देण्यात यावी. तसेच लस शोधल्यास त्याची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात करावी लागेल. तसं न केल्यास लस मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू होईल आणि त्यामधून अधिक गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असं देखील बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. यामध्ये कोरोनाविरुद्धच्या युद्धात तुम्ही आणि तुमच्या सरकारने वेळेत ज्या प्रकारे महत्त्वाची पावलं उचलली आहेत ती कौतुकास्पद आहेत असं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल
Coronavirus : लग्नाचा वाढदिवस पण ड्युटी फर्स्ट, 'या' डॉक्टर दाम्पत्याचं तुम्हीही कराल भरभरून कौतुक
Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! वर्दीसह आईचीही जबाबदारी चोख पार पाडतेय 'ही' कोरोना योद्धा
Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा