CoronaVirus: कर्करोगग्रस्ताच्या मदतीसाठी पोलिसाचा दुचाकीवरून ८६० किमीचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:55 IST2020-04-22T02:07:11+5:302020-04-22T06:55:03+5:30
अधिकाऱ्याने केलेल्या मदतीने रुग्णाचे डोळे पाणावले

CoronaVirus: कर्करोगग्रस्ताच्या मदतीसाठी पोलिसाचा दुचाकीवरून ८६० किमीचा प्रवास
बंगळुरू : एका कर्करोग रुग्णाला तातडीने हवी असलेली औषधे देण्यासाठी बंगळुरूमधील एका परोपकारी पोलीस हेडकॉन्स्टेबलने नुकताच आपल्या स्कूटरवरून ८६० किमीचा प्रवास करत धारवाड गाठले. या अधिकाऱ्याने केलेल्या मदतीने त्या रुग्णाचे डोळे पाणावले.
लॉकडाऊनच्या कालावधित सार्वजनिक व प्रवासी वाहतूक सेवा बंद असून लोकांच्या संचारावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. अशावेळी कर्करोगावरील काही औषधे मिळवून देण्यासाठी मदत करा, असे उमेश नावाच्या एका रुग्णाचे आवाहन बंगळुरूमधील पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. कुमारस्वामी यांनी स्थानिक वृत्तवाहिनीवर ऐकले. या रुग्णाला मदत करायची असे त्यांच्या मनाने घेतले. त्यानंतर उमेशशी थेट संपर्क साधून त्याला आपण औषधे घेऊन येत असल्याचे कळविले.
सहकाऱ्यांनी केला सत्कार
आपण धारवाडला कोणत्या कारणासाठी जात आहोत, याची वरिष्ठांना कल्पना देऊन त्यांची संमती घेतली. त्यानंतर कुमारस्वामी यांनी औषधे घेऊन स्कूटरवरून प्रवासाला प्रारंभ केला. तब्बल ८६० किमीचा प्रवास करून कुमारस्वामी यांनी ती औषधे धारवाडला उमेशला नेऊन दिली. त्या वेळी त्याचे डोळे पाणावले. कुमारस्वामी यांचा मानवतावादी कार्याबद्दल पोलीस दलातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.