Coronavirus : रिकाम्या हॉस्टेलमध्ये क्वारंटाइन सुरू करण्यास परवानगी द्या - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 05:40 IST2020-03-25T01:24:45+5:302020-03-25T05:40:22+5:30
coronavirus : मुंबई आयआयटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विदेशातून परतलेल्यांपैकी कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या, पण तशी कोणतीही चिन्हे दिसून न येणाऱ्या रुग्णांना या क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Coronavirus : रिकाम्या हॉस्टेलमध्ये क्वारंटाइन सुरू करण्यास परवानगी द्या - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशातील सर्व शिक्षण संस्थांच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित केल्या आहेत. नवोदय शाळांची रिकामी हॉस्टेल स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला क्वारंटाइन सुरू करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, असा आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिला आहे.
सर्व शिक्षणसंस्था बंद असल्याने व परीक्षाही स्थगित झाल्याने हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी घरी वा नातेवाइकांकडे गेले आहेत. त्या रिकाम्या हॉस्टेलमध्ये क्वारंटाइन सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती प्रशासनाने शिक्षणसंस्थांना केली होती. त्यानुसार मुंबईतील आयआयटीच्या चार हॉस्टेल व गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाइन याआधीच सुरू करण्यात आले आहे.
मुंबई आयआयटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, विदेशातून परतलेल्यांपैकी कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या, पण तशी कोणतीही चिन्हे दिसून न येणाऱ्या रुग्णांना या क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आयआयटीच्या पवई संकुलातील वनविहार गेस्ट हाउस, एच-१८, एच-बी (बी-विंग), एमटीएनएल गेस्ट रूम येथे या क्वारंटाइन सुरू करण्यात आल्या आहेत.
रिकामी हॉस्टेल, गेस्ट हाउसमध्ये क्वारंटाइन सुरू करण्याची प्रशासनाने केलेली विनंती दिल्ली आयआयटीने मात्र अमान्य केली आहे. देशाच्या विविध भागांतून दिल्ली आयआयटीत शिकायला आलेले विद्यार्थी सध्या घरी परतले असले तरी परदेशी विद्यार्थी हॉस्टेलमध्ये आहेत. त्यामुळेच तिथे क्वारंटाइन सुरू करण्यास दिल्ली आयआयटीने नकार दिला.
तेलंगणात विद्यार्थ्यांचा विरोध
उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध विद्यापीठ, तेलंगणातील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ येथील संकुलातही कोरोनाग्रस्तांसाठी क्वारंटाइन सुरू करण्यात आली आहेत. त्तेलंगणातील विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी दर्शविलेल्या विरोधाला प्रशासनाने जुमानले नाही. गौतम बुद्ध विद्यापीठातील क्वारंटाइनमध्ये १५० रुग्णांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे. .