Corona Virus: भारतात कोरोना पुन्हा पसरणार? मुंबई, महाराष्ट्रातील आकडेवारीही चिंता वाढवणारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 13:01 IST2022-10-19T13:00:32+5:302022-10-19T13:01:27+5:30
Corona Virus in Maharashtra: देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

Corona Virus: भारतात कोरोना पुन्हा पसरणार? मुंबई, महाराष्ट्रातील आकडेवारीही चिंता वाढवणारी
नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मुंबईमध्ये गेल्या ३ दिवसांमध्ये कोरोनाचे १५० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून दररोज १० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.
शुक्रवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ४७७ नवे रुग्ण सापडले होते. त्यामधील १७८ रुग्ण हे मुंबईतील होते. महाराष्ट्रात कोविडच्या नव्या एक्स बी बी सब व्हेरिएंटचा रुग्णही सापडला आहे. त्यामुळे तज्ज्ञही खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत. तज्ज्ञांच्या मते दिवाळीच्या आधी आणि नंतर सणावारांमुळे बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात.
माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार. मुंबईतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते हिवाळ्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईमध्ये इन्फ्लूएंजासारख्या आजारांवरही बारीक नजर ठेवली जाता आहे. हा आजारही संसर्गजन्य आहे.
दरम्यान, काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असेल तरी ते त्याला सामान्य सर्दी खोकला समजून कोरोना चाचण्या टाळू शकता. त्यामुळे तोपर्यंत हा विषाणू इतरांकडे पसरलेला असेल. तज्ज्ञांच्या मते कोरोनामुळे बचावासाठी खबरदारी बाळगली पाहिजे.