Corona Virus : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांचा मृत्यू रोखण्यात 'प्लाझ्मा' थेरपी अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:57 PM2020-09-11T12:57:58+5:302020-09-11T12:59:24+5:30

कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी कितपत उपयोगी ठरते, यावरील अभ्यासासाठी ‘आयसीएमआर’कडून देशभरात चाचणी घेण्यात आली. संशोधनातील या निष्कर्षांविषयी ‘आयसीएमआर’ कडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Corona Virus : Plasma therapy fails to prevent death of critically corona disease patients | Corona Virus : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांचा मृत्यू रोखण्यात 'प्लाझ्मा' थेरपी अपयशी

Corona Virus : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांचा मृत्यू रोखण्यात 'प्लाझ्मा' थेरपी अपयशी

Next
ठळक मुद्देसंशोधनातील या निष्कर्षांविषयी ‘आयसीएमआर’कडून करण्यात आलेली नाही अधिकृत घोषणा

पुणे : देशभरात सुरू असलेल्या प्लाझ्मा थेरपी कोरोनाबाधित रुग्ण गंभीर होण्यापासून किंवा मृत्यू रोखण्यात तितकी प्रभावी नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) अभ्यासातून समोर आले आहे. मेड अर्काइव्ह (मेडआरएक्सआयव्ही) या वैद्यकविषयक संकेतस्थळावर हे संशोधन प्रसिध्द झाले आहे. मात्र, अद्याप या संशोधनातील निष्कर्षांविषयी ‘आयसीएमआर’ कडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी कितपत उपयोगी ठरते, यावरील अभ्यासासाठी ‘आयसीएमआर’कडून देशभरात चाचणी घेण्यात आली. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये कोरोनाला प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडी तयार होतात. त्यामुळे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा बाधित रुग्णाला दिल्यास त्याच्या प्रकृतीत सुधारणा होते की नाही, हे या अभ्यासातून पाहण्यात येणार होते. देशातील ३९ खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये दि. २२ एप्रिल ते १४ जुलै या कालावधीत ४६४ रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी २३५ रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला. तर २२९जणांवर प्रोटोकॉलनुसार उपचार करण्यात आले. या संशोधनातून काढण्यात आलेल्या प्राथमिक निष्कर्षानुसार, प्लाझ्मा दिलेले ३४ (१३.६ टक्के) आणि इतर ३१ (१४.६ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच प्लाझ्मा दिलेल्या ७.२ टक्के रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होत गेली. तर प्लाझ्मा न दिलेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण ७.४ टक्के एवढे होते. सर्व रुग्णांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे होती, असे संकेतस्थळावरील माहितीमध्ये नमुद करण्यात आले आहे.


दरम्यान, या संशोधनामध्ये सहभागी असलेल्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीच्या उपयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘आयसीएमआर’कडून अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. दिल्ली सरकारने प्लाझ्मा थेरपी प्रभावी असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर प्लाझ्मा बँकही तयार करण्यात आली. देशातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना प्लाझ्मा दिला जात आहे. महाराष्ट्रामध्ये प्लॅटिना प्रकल्पाअंतर्गत सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक रुग्णांना प्लाझ्मा दिला जात आहे. ठिकठिकाणी प्लाझ्मा बँक तयार केल्या जात आहेत. त्याबाबत सकारात्मक निष्कर्ष येत असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.

Web Title: Corona Virus : Plasma therapy fails to prevent death of critically corona disease patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.