CoronaVirus News : आता 'या' राज्यात परतलेल्या लोकांना क्वारंटाईन केलं जाणार नाही, १५ जूनपासून सर्व सेंटर्स बंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 16:51 IST2020-06-02T16:28:46+5:302020-06-02T16:51:49+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले 3945 रुग्ण आहेत. यामधील जवळपास 2743 रुग्ण हे परराज्यातून आले आहेत.

CoronaVirus News : आता 'या' राज्यात परतलेल्या लोकांना क्वारंटाईन केलं जाणार नाही, १५ जूनपासून सर्व सेंटर्स बंद!
पटना : परराज्यातून बिहारमध्ये परतलेल्या मजूर, विद्यार्थ्यांना आता क्वारंटाईन करण्यात येणार नाही. तसेच, राज्यातील सर्व ब्लॉक स्तरीय क्वारंटाईन सेंटर सुद्धा 15 जूनपासून बंद करण्यात येणार आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने निर्णय घेतला आहे की, यापुढे राज्यात जे लोक येतील. त्यांची क्वारंटाईनसाठी नोंद केली जाणार नाही. बिहारमध्ये 5 हजार क्वारंटाईन सेंटर्समध्ये सोमवारपर्यंत परराज्यातून आलेल्या जवळपास 13 लाख लोकांची नोंद करण्यात आली आहे.
आम्ही 30 लाखहून अधिक प्रवाशांना परत आणले आहे. सोमवारी संध्याकाळपासून नोंदणी बंद करत आहेत, असे बिहार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, डोर-टू-डोर आरोग्य तपासणी सुरूच राहील आणि वैद्यकीय सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे लेव्हल 1 आणि 2 हॉस्पिटलपर्यंत समान राहील.
दरम्यान, बिहारमध्ये परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले 3945 रुग्ण आहेत. यामधील जवळपास 2743 रुग्ण हे परराज्यातून आले आहेत. आपत्ती विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण 3 मे नंतर बिहारला परतले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले बहुतेक रुग्ण हे महाराष्ट्रातून परतलेले आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या 677 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय दिल्ली (628), गुजरात (405) आणि हरियाणामधून परत आलेल्या 237 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याबरोबर, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा तसेच इतर राज्यामधून परत आलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.