Corona Virus Delhi: कोरोनाची चौथी लाट? दिल्लीत उद्या नव्या निर्बंधांची घोषणा होण्याची शक्यता; डीडीएमएची मोठी बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 21:48 IST2022-04-19T21:45:40+5:302022-04-19T21:48:41+5:30
Corona Virus Delhi: याच महिन्यात देशभरात मास्क सक्ती काढून घेण्यात आली आहे. जानेवारी महिन्यानंतर दिल्लीतील पॉझिटिव्हीटी दर शून्याच्या आसपास गेला होता. पण आता हरियाणा, युपी, चंदीगडच्या दिल्ली सीमाभागात रुग्ण सापडू लागले आहेत.

Corona Virus Delhi: कोरोनाची चौथी लाट? दिल्लीत उद्या नव्या निर्बंधांची घोषणा होण्याची शक्यता; डीडीएमएची मोठी बैठक
कोरोनाच्या सुरुवातीपासून केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांनी धडकी भरविली होती. देशातील बहुतांश रुग्ण या तीन राज्यांतून मिळत होते. यात दिल्लीचा देखील मोठा वाटा होता. या तीन राज्यांत कोरोनाने मान टाकलेली असताना दिल्लीने आता धडकी भरविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दिल्लीत उद्या मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
दिल्ली आणि आजुबाजुच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने टेन्शन वाढविले आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघचनेनुसार ५ टक्के हा धोकादायक आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत 632 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 414 बरे झाले. या पार्श्वभूमीवर उद्या २० एप्रिलला डीडीएमएची महत्वाची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीमध्ये कोणतातरी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुसऱ्या राज्यांच्या तुलनेत दिल्ली आणि एनसीआरमध्ये रुग्ण का वाढत आहेत. टेस्टिंग सहा-सात हजार होत आहे. त्यापैकी ५०० ते ६०० लोकांना कोरोना झाल्याचे समोर येत आहे. यामागे नवा कोरोना व्हेरिअंट आहे की अन्य कोणते कारण हे देखील पाहिले जाणार आहे.
याच महिन्यात देशभरात मास्क सक्ती काढून घेण्यात आली आहे. जानेवारी महिन्यानंतर पॉझिटिव्हीटी दर शून्याच्या आसपास गेला होता. उत्तर प्रदेश, हरियाणामध्ये जे रुग्ण सापडत आहेत ते देखील दिल्ली सीमेवरील आहेत. यामध्ये मुलांची संख्या मोठी आहे. ICMR च्या तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा यादव यांच्यानुसार कोरोनाचे रुग्ण वाढीमागे लोकांची मास्क वापरण्याची सवय संपले हे आहे. त्याचबरोबर लोक मोठ्यासंख्येने एकत्र येऊ लागले आहेत. पूर्वी ते मास्क वापरत होते, आता बिनदिक्कत फिरत आहेत. पुन्हा एकदा कोरोना निर्बंधांचे कठोर पालन करणे गरजेचे आहे आणि मास्कही गरजेचे आहे.
दिल्लीमध्ये २ एप्रिलपासून मास्क घालण्याचा नियम हटविण्यात आला होता. यापुढे दंड आकारला जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. यामुळे जे लोक मास्क वापरत होते, त्यांनी देखील मास्क वापरणे बंद केले. दिल्लीतील रुग्णवाढीमागे हे एक कारण दिसत आहे. अन्य तज्ज्ञांनीही कोरोना निर्बंध पुन्हा आणण्याचे म्हटले आहे.