कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. आशियामध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य तज्ज्ञांनी नवीन उद्रेकाची जास्त भीती नसल्याचं म्हटलं आहे. तसेच हा ट्रेंड फ्लूसारख्या प्रकरणांमध्ये हंगामी वाढ असल्याचं सांगितलं, ज्यामध्ये बहुतेक सौम्य लक्षणं आहेत. सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडसारख्या देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ज्याचं मुख्य कारण JN.1, LF.7 आणि NB.1.8 सारख्या नवीन ओमायक्रॉन सबव्हेरिएंटचा प्रसार हे आहे.
सिंगापूरमध्ये, आठवड्याला कोरोनाचे रुग्ण २८% ने वाढले, एप्रिलच्या अखेरीस ११,१०० असलेली संख्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १४,२०० पर्यंत वाढली. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही ३०% ने वाढले. ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये व्हायरसशी संबंधित ३१ मृत्यूंची नोंद झाली. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी तज्ज्ञांचा मते, बहुतेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही.
देशभरात २५७ एक्टिव्ह रुग्ण
"आशियामध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांमधील बहुतेक प्रकरणं ही सौम्य आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही" असं नवी दिल्लीतील एम्स येथील सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिनचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. हर्षल साळवे यांनी आयएएनएसला सांगितलं. भारतातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. १९ मे रोजी आरोग्य मंत्रालयाने केलेल्या आढाव्यात देशभरात २५७ एक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, मात्र अधिकाऱ्यांनी परिस्थिती 'नियंत्रणात' असल्याचं म्हटलं आहे.
कोरोना रिटर्न्स! 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, पाहा कुणाला सर्वाधिक धोका
"कोरोना हा एक असा आजार आहे ज्यामध्ये दर काही महिन्यांनी रुग्ण वाढतील. हे अंतर सहा ते नऊ महिन्यांपर्यंत असू शकतं. इतर आशियाई देशांप्रमाणे, भारतातही आपण कोरोनाचे रुग्ण पाहत आहोत. परंतु ते रुग्णालयांमध्ये दाखल झालेले नाहीत आणि पूर्वीपेक्षा जास्त गंभीर नाहीत. बहुतेक रुग्ण इतके सौम्य आहेत की त्यांच्यावर बाह्यरुग्ण म्हणून उपचार केले जात आहेत" असं केरळ राज्य आयएमएच्या संशोधन कक्षाचे संयोजक डॉ. राजीव जयदेवन यांनी म्हटलं आहे.
तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
"पूर्वीच्या लसीकरणामुळे आणि मागील संसर्गातून वाचल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आता थोडी मजबूत झाली आहे. कोरोना आता पूर्वीसारखी विनाशकारी शक्ती राहिलेली नाही. बहुतेक संसर्ग सौम्य असले तरी, वृद्ध आणि आजार असलेल्यांना धोका असल्याचा असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. "जेव्हा रुग्णसंख्या वाढते तेव्हा नेहमीपेक्षा जास्त खबरदारी घेणं महत्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं उपयुक्त ठरेल. ज्यांना ताप आहे त्यांनी घरीच राहावं आणि इतरांशी भेटणं टाळावं" असा सल्ला डॉ. जयदेवन यांनी दिला आहे.