कोरोनानं पुन्हा वेग पकडला, दिल्ली-महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढली; जाणून घ्या देशाची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 23:44 IST2022-06-12T23:43:55+5:302022-06-12T23:44:32+5:30
Corona Virus Update: देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40,370 वर पोहोचली आहे...

कोरोनानं पुन्हा वेग पकडला, दिल्ली-महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढली; जाणून घ्या देशाची स्थिती
देशातील महानगरांमध्ये कोरोना (Corona Virus) रुग्ण संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढाताना दिसत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत दैनंदीन कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर महाराष्ट्रातही रोजच्या रोज 2 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित समोर येऊ लागले आहेत (Maharashtra Corona Update).
महाराष्ट्रात सातत्याने वाढतायत रुग्ण -
महाराष्ट्रासंदर्भात बोलायचे झाल्यास, राज्यात रविवारी 2,946 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,432 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच आज राज्यात कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 16,370 एवढी आहे. दरम्यान, देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी देशातील नव्या रुग्णांची संख्या 8 हजारांच्याही पुढे गेली आहे.
दिल्लीत नव्या कोरोना बाधितांनी 700 चा टप्पा ओलांडला -
दिल्लीत रविवारी पुन्हा एकदा नव्या कोरोना बाधितांनी 700 चा टप्पा ओलांडला. दिल्ली सरकारच्या हेल्थ बुलेटिननुसार, दिल्लीत गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 795 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 556 जण बरे होऊन घरी परतले असून कुणाचाही मृत्यू झालेला नाही. ताज्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सध्या कोरोनाचे 2,247 सक्रिय रुग्ण असून मृत्यू दर 4.11 टक्के एवढा आहे. दिल्लीत आतापर्यंत 19,12,063 रुग्ण समोर आले आहेत. तर 18,83,598 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 26,218 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे देशाची स्थिती -
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 8,329 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. कालच्या तुलनेत हा आकडा 745 ने अधिक आहे. याच बरोबर आता देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40,370 वर पोहोचली आहे. तर, गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 3,44,994 चाचण्यांमध्ये दैनिक सकारात्मकता दर 2.41 असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, साप्ताहिक सकारात्मकता दर 1.75 टक्के नोंदवण्यात आला आहे.