Corona Virus : बिहारची मृतांच्या संख्येत दुरुस्ती; आकडेवारी वाढली, बरे होणारे वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 05:47 IST2021-06-11T05:47:09+5:302021-06-11T05:47:30+5:30
Corona Virus: केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात गुरुवारी कोरोनाचे ९४ हजार ५२ नवे रुग्ण आढळून आले व १ लाख ५१ हजार ३६७ जण बरे झाले.

Corona Virus : बिहारची मृतांच्या संख्येत दुरुस्ती; आकडेवारी वाढली, बरे होणारे वाढले
नवी दिल्ली : बिहारने कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या आकड्यात बुधवारी ३९७१ इतक्या संख्येने दुरुस्ती केल्याने गेल्या चोवीस तासांत देशातील या आकडेवारीत ६१३८ पर्यंत वाढ झाली. ही एका दिवसात नोंदली गेलेली कोरोना बळींची सर्वोच्च संख्या आहे. नव्या रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात गुरुवारी कोरोनाचे ९४ हजार ५२ नवे रुग्ण आढळून आले व १ लाख ५१ हजार ३६७ जण बरे झाले. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ असून त्यातील २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ जण बरे झाले. कोरोना बळींची एकूण संख्या ३ लाख ५९ हजार ६७६ झाली असून, सक्रिय रुग्णांचा आकडा ११ लाख ६७ हजार ९५२ इतका आहे.
लसींचे २४ कोटी २७ लाख डोस
- कोरोना लसींचे आतापर्यंत २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ डोस देण्यात आले आहेत.
- देशात सलग २८ व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.२३ टक्के झाला आहे.