Corona vaccine will be available in private hospitals for Rs 250 | खूशखबर! खासगी रुग्णालयांमध्ये  २५० रुपयांत मिळेल कोरोनावरील लस

खूशखबर! खासगी रुग्णालयांमध्ये  २५० रुपयांत मिळेल कोरोनावरील लस

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला आहे. लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून काेराेनाची लस टाेचून घेऊ शकतात. त्यासाठी २५० रुपये एका डाेसचे शुल्क निश्चित केले आहे. लसीकरणामध्ये खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविण्याबाबत केंद्र सरकारने संकेत यापूर्वी दिले हाेते.


काेराेना लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारीपासून सुरू झाला हाेता. आता दुसरा टप्पा साेमवार, १ मार्चपासून सुरू हाेत आहे. त्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिक लस घेऊ शकतात. त्यासाठी २५० रुपये एका डाेससाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामध्ये लसीची किंमत १५० रुपये असून १०० रुपये सेवेसाठी आकारण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालये यापेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाहीत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हेच शुल्क राहणार आहे, असे राष्ट्रीय आराेग्य मिशनच्या अतिरिक्त सचिव वंदना गुरनानी यांनी स्पष्ट केले. सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरण माेफत राहणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाबाबत विविध राज्यांच्या आराेग्य सचिवांची २६ फेब्रुवारीला बैठक झाली. त्यात याबाबत केंद्रीय आराेग्य विभागातर्फे माहिती देण्यात आली हाेती.  

सोबत घेऊन जा
n लाभार्थ्यांनी आधार कार्ड, निवडणूक आयाेगाचे ओळखपत्र किंवा सरकारने दिलेले ओळखपत्र साेबत नेणे आवश्यक आहे. 
n तसेच इतर आजार असलेल्या ४५ ते ५९ या वयाेगटातील नागरिकांसाठी डाॅक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
पूर्वनाेंदणी आवश्यक
इच्छुक लाभार्थ्यांनी ‘काेविन २.०’ तसेच ‘आराेग्य सेतू’ या ॲपवर नाेंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष लसीकरण केंद्रात जाऊनही नाेंदणी करता येईल.

या रुग्णालयांमध्ये 
घेता येईल लस

सार्वजनिक आराेग्य केंद्र |  कम्युनिटी आराेग्य केंद्र  | आयुष्मान भारत आराेग्य केंद्र | उपजिल्हा रुग्णालये | जिल्हा रुग्णालये | वैद्यकीय महाविद्यालयाची रुग्णालये | ‘सीजीएचएस’चे आणि आयुष्मान भारत पंतप्रधान जन आराेग्य याेजनेच्या पॅनेलमधील खासगी रुग्णालये
याच खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपये शुल्क देऊन लस घेता येईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona vaccine will be available in private hospitals for Rs 250

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.