Corona vaccine will be available in four to five years- adar poonawalla; The current production of the vaccine is insufficient | कोरोना लस चार-पाच वर्षांनी मिळेल- अदर पुनावाला; लसीचे सध्याचे उत्पादन अपुरे

कोरोना लस चार-पाच वर्षांनी मिळेल- अदर पुनावाला; लसीचे सध्याचे उत्पादन अपुरे

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीचे सध्या होत असलेले उत्पादन पुरेसे नसून जगभरातील प्रत्येकाला ही लस मिळण्यासाठी अजून चार ते पाच वर्षे वाट पाहावी लागेल, असे सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांनी म्हटले.
पुनावाला म्हणाले, भारतामध्ये लस साठविण्यासाठी शीतगृहांची पुरेशी संख्या नाही, तसेच या लसींची सुरक्षितपणे वाहतूक करण्याची नीटशी व्यवस्था उपलब्ध नाही. या सर्व गोष्टी बघता २०२४ सालापर्यंत देशामध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवत राहील. कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनाचे प्रमाण संबंधित कंपन्यांनी सध्या वाढविलेले नाही.
अदर पुनावाला यांनी सांगितले की, गोवराच्या प्रतिबंधासाठी राष्ट्रीय स्तरावर ज्याप्रमाणे लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येतो त्याच धर्तीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला, तर त्या लसीच्या किमान १५ अब्ज डोसची आवश्यकता भासणार आहे. भारतातील १.४ अब्ज लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी देशात योग्य वितरण, तसेच वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही.
कोरोना लस विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अ‍ॅस्ट्राझेनिसासह पाच महत्त्वाच्या कंपन्यांशी सिरम इन्स्टिट्यूटने लसीच्या १ अब्ज डोसचे उत्पादन करण्याचा करार केला आहे. त्यातील निम्म्या लसींचे उत्पादन तर केवळ भारतासाठीच होणार आहे. त्याशिवाय रशियाच्या गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूटबरोबर तिने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन करण्याचा करार सिरम इन्स्टिट्यूटने केला आहे.
पुनावाला म्हणाले की, इतर लस उत्पादकांपेक्षा सिरम इन्स्टिट्यूटने ठरविलेले लस उत्पादनाचे लक्ष्य मोठे आहे. लस आॅक्टोबर महिन्यापर्यंत उपलब्ध होईल या काही लोकांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही. अमेरिका, युरोपने लस उत्पादनासाठी मोठी आॅर्डर दिली असल्याने इतर देशांकरिता लसीचे उत्पादन करण्यास आणखी उशीर लागेल.

यंदाच अमेरिकेत लस मिळणार?

वॉशिंग्टन : अमेरिकेत जनतेला फायझर कंपनीची कोरोना प्रतिबंधक लस यंदाच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे त्या कंपनीचे सीईओ अल्बर्ट बौर्ला यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आम्ही विकसित करीत असलेल्या लसीच्या उत्पादनासही सुरुवात झाली आहे. चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याचे प्रयोग यशस्वी झाले तर त्यानंतर काही दिवसांतच ही लस उपलब्ध करून देऊ. ही लस किती प्रभावी आहे याचा ६० टक्के अंदाज आॅक्टोबरमध्ये येईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona vaccine will be available in four to five years- adar poonawalla; The current production of the vaccine is insufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.