Corona Vaccine: कोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:36 IST2021-07-27T16:35:21+5:302021-07-27T16:36:23+5:30
Corona Vaccination: मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या लसीकरणाबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

Corona Vaccine: कोरोनाची लस न घेणाऱ्या शिक्षकांचा एक महिन्याचा पगार कापणार, येथील प्रशासनाने घेतला निर्णय
भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या लसीकरणाबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भोपाळ जिल्ह्यामधील डीईओंनी लस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याबाबत सूचना दिली आहे. (One month salary of teachers not vaccinated against corona vaccine)
कोरोनाविरोधातील लस न घेण्यासाठी योग्य कारण न देणाऱ्या शिक्षकांचे एका महिन्याचे वेतन कापले जाईल. जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन सक्सेना यांनी याबाबत सांगितले की, शिक्षकांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. भोपाळ जिल्ह्यात एकूण १७ सेंटर उघडण्यात आली आहेत.
आतापर्यंत ९२ शिक्षक असे आहेत ज्यांनी पहिला डोस घेतलेला नाही. सहा दिवसांच्या आत लस न घेण्यामागचे योग्य कारण न दिल्यास या शिक्षकांचे एका महिन्याचे वेतन कापले जाईल. राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहे.
शिक्षक काँग्रेसचे प्रांतीय अध्यक्ष सुभाष सक्सेना यांनी सांगितले की भोपाळ जिल्ह्यामध्ये सुमारे एक हजार शिक्षक असे आहेत. ज्यांचे आतापर्यंत लसीकरण झालेले नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये भोपाळ जिल्हा सर्वात लहान आहे. राज्यात सुमारे ३० ते ४० हजार शिक्षकांना अद्यापही लसीचा पहिला डोस मिळालेला नाही. आता कॅम्पच्या माध्यमातून शिक्षकांचे लसीकरण करण्याची तयारी केली जाणार आहे.
दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन सक्सेना यांनी सांगितले की, भोपाळमध्ये ११०० नाही तर ९२ शिक्षक असे आहेत ज्यांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आलेला नाही. लस न घेतलेल्या शिक्षकांची यादी माझ्याजवळ आहे. सर्वांना लस देण्यासाठी ५ ते सहा दिवसांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्य सचिव इक्बाल सिंग बैंस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी बैंस यांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा आदेश दिला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल. २६ ते ३१ जुलैपर्यंत ६ दिवसांमध्ये शाला आणि महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र तयार करून सर्व शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला जाईल.