Corona Vaccination Vaccination for all over 18 years only if production increases | Corona Vaccination: ...तरच 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लस; महत्त्वाची माहिती आली समोर

Corona Vaccination: ...तरच 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लस; महत्त्वाची माहिती आली समोर

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : देशात आज कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त दिसत असली तरी राज्याने ६ एप्रिलपर्यंत ८५.६ लाख लोकांचे लसीकरण केले होते. बुधवारी महाराष्ट्राने ४.३० लाख लस दिल्या. ‘लोकमत’ला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेला वेग दिला असून रोज तेथे ४ लाख लोकांना लस दिली जात आहे. राज्यात एका आठवड्यात लसीकरण दुप्पट झाले. 

३१ मार्च रोजी २.२० लाख लसीकरण झाले होते, तर ५ एप्रिल रोजी ४.४० लाख. १८ वर्षे आणि त्यापुढील वयाच्या लोकांना लस दिली जावी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विनंती केंद्र सरकारने अजून मान्य केलेली नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिरम इन्स्टिट्यूट (काेविशिल्ड) आणि भारत बायोटेकची (कोव्हॅक्सिन) लस उत्पादित करण्याची सध्याची क्षमता अपुरी असल्यामुळे लस सर्वांना दिली जाऊ शकत नाही.

भारताने ६ एप्रिलपर्यंत १७० दशलक्ष (८.७५ कोटी) लस मात्रा दिल्या असून ४५ वर्षांच्या वरील सर्व ३० कोटी लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठरवले आहे. यात तीन कोटी आरोग्य आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. अतिरिक्त ४३० दशलक्ष डोसेसची गरज आहे.

सध्याच्या वेगाने दोन पुरवठादारांना लसीची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी सात महिने लागतील. सिरमकडे जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांना लस निर्यातीची मोठी जबाबदारी आहे. ही प्रचंड मागणी सध्याची लस उत्पादन क्षमता वाढवली आणि बाजारात नव्या लसी आल्या तर पूर्ण केली जाऊ शकते. 

महाराष्ट्रात ६ एप्रिल रोजी कोरोना रुग्णवाढीचा दर १४.९ टक्के आहे. तो खाली आणायचा असेल तर लसीकरण दुप्पट करावे लागेल. कोरोना रुग्णवाढीचा महाराष्ट्राचा दर हा देशात सर्वोच्च असून, मृत्यू होण्याचे प्रमाण १.८ टक्के आहे. मुंबई, पुण्यासह इतर शहरांत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे.

लसीच्या आवश्यकतेवरून वाद हास्यास्पद : राहुल गांधी 
नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत वादविवाद करणे हास्यास्पद असून, प्रत्येक भारतीयाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे, असे स्पष्ट करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्व नागरिकांना लस मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. 
राहुल गांधी यांनी कोविड व्हॅक्सिन हॅशटॅगने ट्वीट करत म्हटले आहे की, आवश्यकता आणि इच्छा याबाबत वादविवाद करणे हास्यास्पद आहे. देशात सध्या लसीकरण सुरू असून, आता ४५ वर्षांवरील लोकच लस घेऊ शकतात. 

महाराष्ट्रातील रोजची लसीकरण संख्या
३१ मार्च- २.२० लाख
एक एप्रिल- १ ३.१० लाख
दोन एप्रिल- ५.१० लाख
तीन एप्रिल- ३.३० लाख
चार एप्रिल- ३.३० लाख
पाच एप्रिल- ४.४० लाख
सहा एप्रिल- ४.३० लाख

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccination Vaccination for all over 18 years only if production increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.