Corona Vaccination: देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्राने पटकाविला पहिला क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 06:32 IST2021-06-03T06:31:29+5:302021-06-03T06:32:04+5:30
खाजगी रुग्णालयांकडून लसींची २५ टक्के कोट्यापेक्षा कमी खरेदी

Corona Vaccination: देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्राने पटकाविला पहिला क्रमांक
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : देशात सर्वाधिक लसीकरण करण्याबाबत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. कोरोना लसींच्या पुरवठ्यावरून केंद्र व राज्य सरकार यांच्यात जुंपलेली असताना, खाजगी रुग्णालयांनी त्यांच्यासाठी असलेल्या कोरोना लसींच्या २५ टक्के साठ्यापेक्षा कमी डोस विकत घेतले आहेत. मे महिन्यामध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लसींपैकी राज्यांनी आपल्या २५ टक्के साठ्यापेक्षा जास्त डोसची खरेदी केली आहे.
मे महिन्यामध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लसींच्या ७.२९ कोटी डोसपैकी केंद्राने ४.०३ कोटी, राज्यांनी २.६६ कोटी तसेच रुग्णालये, वैद्यकीय संस्थांनी १.२४ कोटी डोस खरेदी केले. त्यासाठी केंद्र सरकारने ५०:२५:२५ अशा प्रमाणात लसींचे वितरण केले आहे. जर केंद्र सरकारने त्याच्या ५० टक्के कोट्यापेक्षा आणखी ६ लाख अधिक डोसची खरेदी केली असती तर राज्य सरकारे आक्रमक झाली असती. राज्यांनी १.९८ कोटींच्या ऐवजी २.६६ कोटी डोसची खरेदी केली. म्हणजे ठरलेल्या कोट्यापेक्षा ६८ लाख जादा डोस राज्यांनी विकत घेतले.
सर्वाधिक लसीकरण करणारी दहा राज्ये
- देशात सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
- मे महिन्यात महाराष्ट्राने युवकांचे मोठ्या संख्येने लसीकरण केले आहे.
- १८ ते ४४ वर्षे वयोगटातील प्रत्येकी १० लाख लोकांना कोरोनाचा पहिला डोस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या दहा राज्यांचा समावेश आहे.
- १८ ते ४४ वयोगटातील ३९,२८२ लाभार्थींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर या वयोगटातील २.१३ कोटी लोकांना मे महिन्यात एक डोस देण्यात आला आहे.