कोरोनाच्या 'R Value' ने वाढवली चिंता, जानेवारीनंतर पहिल्यांदाच वाढला ग्राफ, जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:04 IST2022-04-20T18:04:09+5:302022-04-20T18:04:42+5:30
corona : भारतात कोरोनाचा R Value एकापेक्षा जास्त झाली आहे. चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या संशोधकांनी हा अंदाज लावला आहे.

कोरोनाच्या 'R Value' ने वाढवली चिंता, जानेवारीनंतर पहिल्यांदाच वाढला ग्राफ, जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली : भारतात जानेवारी महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या (Coronavirus Infection in India) आकडेवारीने चिंता वाढवली आहे. देशात कोरोनाची प्रभावी प्रजनन संख्या म्हणजेच आर व्हॅल्यूचा (R Value) वाढता दर हा संसर्ग किती वेगाने पसरत आहे, याचे सूचक आहे. भारतात कोरोनाचा R Value एकापेक्षा जास्त झाली आहे. चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या संशोधकांनी हा अंदाज लावला आहे.
दरम्यान, R Value एका पेक्षा जास्त असणे हे सूचित करते की, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. हा दर 1 च्या खाली राहिला तर साथीचे रोग नियंत्रणात राहतील. तसेच, जर हा दर 1 पेक्षा खूपच कमी असेल, तर हे दर्शविते की रोगाचा संसर्ग थांबला आहे. यावर्षी कोरोनाचा R Value ही 1 ते 10 जानेवारी दरम्यान 2.98 वर पोहोचली होती. कारण या काळात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढली होती.
या संशोधकांच्या मते, गेल्या काही आठवड्यांत देशात कोरोनाची R Value झपाट्याने वाढली आहे. 12-18 एप्रिल दरम्यान हा दर 1.07 होती, तर 5-11 एप्रिल दरम्यान R Value ही 0.93 होती. संस्थेचे संशोधक सीताभ्रा सिन्हा यांच्या मते, 16-22 जानेवारी दरम्यान 1 च्या वर होती. त्यावेळी R Value ही 1.28 होती. सीताभ्रा सिन्हा यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, या दराचे कारण केवळ दिल्लीतील कोरोनाची वाढती प्रकरणे नसून हरयाणा आणि उत्तर प्रदेशशी संबंधित प्रकरणे देखील आहेत.
सीताभ्र सिन्हा यांनी सांगितले की, जवळपास सर्वच प्रमुख शहरे – मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई R Value ही 1 च्या वर आहे. तर दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये R Value ही 2 च्या वर आहे. सध्या कोलकाता डेटा उपलब्ध नाही. 18 एप्रिल रोजी संपणाऱ्या आठवड्यासाठी अंदाजे R Value दिल्लीसाठी 2.12, उत्तर प्रदेशसाठी 2.12, कर्नाटकसाठी 1.04, हरयाणासाठी 1.70, मुंबईसाठी 1.13, चेन्नईसाठी 1.18 आणि बेंगळुरूसाठी 1.04 आहे. दरम्यान, केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे R Value अनुक्रमे 0.72 आणि 0.88 आहे. सध्या कर्नाटकात R Value ही 1 पेक्षा जास्त आहे आणि याचे कारण बेंगळुरूमधील वाढती कोरोना प्रकरणे असू शकतात, असे सीताभ्रा सिन्हा यांनी सांगितले.