Corona outbreak: Infecting 21,000 people in a day in the country | Coronvirus: कोरोनाचा उद्रेक: देशात दिवसभरात तब्बल २१ हजार जणांना बाधा 

Coronvirus: कोरोनाचा उद्रेक: देशात दिवसभरात तब्बल २१ हजार जणांना बाधा 

नवी दिल्ली : देशात गुरुवारी प्रथमच कोरोनाचे २० हजार ९०३ रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ६ लाख २५ हजार ५४४ झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या पाच राज्यांमध्ये २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

या २४ तासांत महाराष्ट्रात ६३२८, तामिळनाडूमध्ये ४३४३, दिल्लीमध्ये २३७३, कर्नाटकात १५०२ तर तेलंगणामध्ये १२१३ जणांना बाधा झाल्याचे आढळले. आंध्रात रुग्णांची संख्या ८४५ ने वाढली. या सहा राज्यांतील रुग्णांची संख्या १७ हजारांच्या आसपास आहे. या सर्व राज्यांमध्ये बाधितांची संख्या १५ हजार वा त्याहून अधिक आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १ लाख ८६ हजार ६२६ झाली आहे. आतापर्यंत कोरोनाने मरण पावलेल्यांची संख्या १८ हजार २१३ झाली असून, त्यात गेल्या २४ तासांतील ३७९ जणांचा समावेश आहे. मात्र देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढून ६०.७३ टक्के झाले आहे. संख्येत सांगायचे, तर आतापर्यंत ३ लाख ७७ हजार ८९१ रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या २ लाख २७ हजार ४३९ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण जूनमध्ये वाढले आणि १ जून ते २ जुलै या काळात ४ लाख ३५ हजार जणांना संसर्ग झाल्याचे चाचण्यांतून दिसून आले.

मृतांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ८१७८ असून, त्याखालोखात दिल्ली (२८६४), गुजरात (१८८६), तामिळनाडू (१३३२), उत्तर प्रदेश (७३५) पश्चिम बंगाल (६९९), मध्य प्रदेश (५८९), राजस्थान (४३०) व तेलंगणा (२७५), कर्नाटक (२७२) या राज्यांचा क्रमांक लागतो. हरयाणा, आंध, पंजाब आणि जम्मू व काश्मीर या चार राज्यांत मृतांची संख्या प्रत्येकी २०० हून कमी आहे.

देशभरातील नमुन्यांची तपासणी वेगाने
देशात नमुन्याची तपासणीही वेगाने सुरू असून, गुरुवारी २ लाख ४१ हजार ५६१ नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत देशात ९२ लाख ९७ हजार ७४९ चाचण्या पार पडल्या, अशी माहिती आयसीएमआरतर्फे देण्यात आली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona outbreak: Infecting 21,000 people in a day in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.