Corona, construction stalled due to fear of lockdown, workers returning home | कोरोना, लाॅकडाऊनच्या भीतीसोबत मजुरांअभावी बांधकामे रखडली, मजूर गावी परतत असल्याचा फटका

कोरोना, लाॅकडाऊनच्या भीतीसोबत मजुरांअभावी बांधकामे रखडली, मजूर गावी परतत असल्याचा फटका

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाने महाराष्ट्रास देशभरातील अन्य भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन लागण्याच्या शक्यतेने विकास कामे रखडली आहेत. रात्रीच्या संचारबंदीमुळे दिवसाच काम 
होत आहे. शिवाय स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतत असल्याने मजुरांची संख्याही रोडावल्याने बांधकामाची गतीही मंदावली आहे. त्यामुळे नियोजित प्रकल्पांचे काम पूर्ण होण्यास दिरंगाई होऊ शकते.
राजधानी दिल्लीत बांधकामावरील मजुरांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली आहे. दिल्लीत विविध विकास कामे करणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या तीन प्रमुख परिसरातील कामाची गती आधीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के कमी झाली आहे. संचारबंदीमळे एका पाळीत काम होत आहे.
बांधकामांची मदार पूर्णत: स्थलांतरित मजुरांवर असते. गेल्या पंधरा दिवसांपासून लॉकडाऊनची भीती सतावत आहे. यामुळे स्थलांतरित मजूर गावी परतल्याने अशा मजुरांची संख्या जवळपास २० टक्के कमी होऊ शकते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्यानुसार मजुराच्या कमतरतेमुळे दिल्ली मेट्रोसह अनेक प्रमुख बांधकामावर परिमाण झाला आहे. कोरोनाबाधित होऊ, अशी मजुरांना भीती आहेच; परंतु, मागच्या वर्षी अचानक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याप्रमाणे अडकण्याची जास्त भीती सतावत आहे. त्यामुळे बहुतांश मजूर आपापल्या गावी परतत आहेत. ते लवकर परतील, अशी आशा आहे.
मजुरांअभावी सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या कामांवर मोठा परिणाम झाला आहे. यापैकी अंतिम टप्प्यात पोहोचलेला आश्रम अंडरपास, बेनिता-हुआरेज अंडरपास, शाहदरा दक्षिण विभागाच्या मुख्यालयाच्या बांधकामाचा यात समावेश आहे. याशिवाय प्रगती मैदान भुयाराच्या कामाची गतीही मंदावली आहे. या कामाची मुदत आधीच सहा वेळा वाढविण्यात आली. आता उर्वरित काम जून ऐवजी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होऊ शकते.

नजीकच्या काळात समस्या वाढणार
या कामाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या संख्येने गावी गेलेल्या मजुरांना माघारी आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दिल्ली मेट्रो चौथ्या टप्प्यातील तीन कॉरिडोर आणि त्रिलोकपुरी पिंक लाईन, पंजाबी बागेत इंटरचेंज स्टेशनच्या फुटओव्हर पुलाचे काम चालू आहे. मजुरांची संख्या कमी झाल्याने नजीकच्या काळात समस्या वाढू शकतात.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona, construction stalled due to fear of lockdown, workers returning home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.