निवडणूक झालेल्या राज्यांत काेराेनाचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 05:46 IST2021-05-03T05:46:30+5:302021-05-03T05:46:58+5:30
पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेशात जोमाने रुग्णवाढ

निवडणूक झालेल्या राज्यांत काेराेनाचा स्फोट
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात देशभरात कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड संख्येने वाढ झाली. १ एप्रिल रोजी देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ८१ हजार होता. तो ३० एप्रिल रोजी ४ लाख एवढा झाला. या सगळ्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णवाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ज्या राज्यांमध्ये निवडणूक होती त्या राज्यांत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णवाढीचा सर्वाधिक वेग आसाममध्ये होता.
गेल्या महिन्यात पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली, तर उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकांसाठी प्रचार झाला. या कालावधीत या सर्व राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जोमाने वाढल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. आसाममध्ये १ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या अवघी ५८ होती. ३० एप्रिल रोजी ही संख्या ३,१९७ एवढी झाली. याचाच अर्थ एकट्या आसामात एक महिन्यात तब्बल ५४१२ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदविली गेली. याच कालावधीत पश्चिम बंगालमध्ये १२६६ टक्के, केरळ आणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे १२२९ आणि १२२७ टक्के, तर तामिळनाडू आणि पुदुच्चेरीत अनुक्रमे ५६३ आणि ३५९ टक्के रुग्णवाढीची नोंद झाली.
कर्नाटक आणि गुजरात या भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कर्नाटक तर आता कोरोनाची राजधानी म्हणून उदयाला येऊ लागले आहे.
कर्नाटकात १ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या अवघी ४,२३४ एवढी होती. ती ३० एप्रिल रोजी ४८,२९६ एवढी झाली.
गुजरातमध्येही याच कालावधी ५०६ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदविली गेली. दिल्लीतही ९९१% रुग्णवाढ झाली आहे.
कोरोनाची बाधा झालेले तीन लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत नोंद झाले. याच कालावधीत तीन हजार ६८९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या दोन लाख १५ हजार ५४२ झाली आहे.