धर्मांतर वाद चिघळला
By Admin | Updated: December 22, 2014 04:18 IST2014-12-22T04:18:53+5:302014-12-22T04:18:53+5:30
धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे ‘घर वापसी’चे आक्रमक कृतिशील समर्थन विश्व हिंदू परिषदेने सुरू केले आहे.

धर्मांतर वाद चिघळला
नवी दिल्ली : धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचे ‘घर वापसी’चे आक्रमक कृतिशील समर्थन विश्व हिंदू परिषदेने सुरू केले आहे. धर्मांतराबाबतच्या वादग्रस्त विधानांनी मोदी सरकारची डोकेदुखी वाढलेली असतानाच विहिंप नेत्यांच्या वक्तव्यांनी वाद चिघळू लागला आहे. गुजरातमधील आदिवासींच्या घर वापसीचा कार्यक्रम आणि दिल्लीत अशोक सिंघल यांनी केलेली विधाने यामुळे या वादाची धग आणखी वाढली. परिणामी राज्यसभेत सरकार आणि विरोधकांमध्ये झालेली कोंडी फुटणे अवघड बनले आहे.
आम्ही धर्मपरिवर्तन नव्हे, तर लोकांची मने जिंकायला निघालो आहोत, अशी भूमिका घेत जगभरातील युद्धांसाठी ख्रिश्चन आणि मुस्लीमच कारणीभूत असतात, असे वादग्रस्त विधान विहिंप नेते अशोक सिंघल यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. मुस्लीम, ख्रिश्चन हे युद्धातील खेळाडू आहेत, असे सांगत त्यांनी ‘घर वापसी’चे समर्थन केले.
> पदत्यागाची चर्चा तथ्यहीन
धर्मांतराच्या मुद्द्यावर संघ परिवारातील नेते करीत असलेल्या वक्त व्यांमुळे नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याची भाषा केल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचा खुलासा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे.
> राज्यसभेतील कोंडी कायम राहणार ?
> कोलकात्यात सरसंघचालकांनी केलेले हिंदू राष्ट्राविषयीचे सूचक भाष्य आणि सिंघल यांनी केंद्रात हिंदू सरकार आल्याचे केलेले वक्तव्य या पार्श्वभूमीवर राज्यसभेतील कोंडी कायम राहील, अशी चिन्हे आहेत.
> विरोधकांचा पारा आणखी वाढेल, अशा वादग्रस्त विधानांच्या जोडीला विश्व हिंदू परिषदेने ‘घर वापसी’ची मोहीम सुरूच ठेवली आहे. रविवारी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील अरनाई येथे ख्रिश्चन समाजातील
सुमारे ५०० जणांचे धर्मपरिवर्तन करण्यात आले.
> बळ किंवा लालूच दाखवून हे धर्मांतर करण्यात आलेले नाही, असा दावाही विहिंपने केला आहे. हे सर्व जण आधी हिंदूच होते, मात्र नंतर या सर्वांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणल्याचा दावा विहिंपचे स्थानिक नेते नातू पटेल यांनी केला.
> विहिंपच्या या कार्यक्र माबाबत वलसाडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. धर्मांतराचा कार्यक्र म आयोजित करण्यापूर्वी विहिंपने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती का, हे स्पष्ट झालेले नाही.