अधिवेशन-४ लीड

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:16+5:302015-03-20T22:40:16+5:30

शिवसेनेला इशारा तर काँग्रेसला गाजर

Convention-4 Lead | अधिवेशन-४ लीड

अधिवेशन-४ लीड

वसेनेला इशारा तर काँग्रेसला गाजर
-विधान परिषदेत नेमके काय घडले?: बिनविरोध निवडीमागील राजकारण
मुंबई- विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार रिंगणात ठेवला आणि काँग्रेसची मते घेतली तर सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी ठेवा, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने शिवसेनेने नमते घेतले, अशी चर्चा आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसला विधान परिषदेतील उपसभापतीपदाचे गाजर दाखवले असल्याने काँग्रेसने माघार घेतल्याचे बोलले जाते.
शिवसेनेच्या डॉ. नीलम गोर्‍हे यांना पहिल्या महिला सभापती म्हणून काँग्रेसच्या मदतीने पदावर बसवायचे अशी तयारी शिवसेनेने केली होती. भाजपा सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामराजे निंबाळकर यांना मते देणार नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी त्यांची अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली तेव्हा स्पष्ट केले होते. भाजपाबरोबर असलेल्या चार अपक्षांनी तरी तटस्थ राहू नये याकरिता पवार हे फडणवीस यांना विनंती करीत होते. मात्र दिल्लीतून अमित शहा यांच्याकडून जो निरोप येईल त्यानुसार मतदान होईल. भाजपा तटस्थ व भाजपासोबतचे अपक्ष राष्ट्रवादीसोबत हे होणार नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिले होते.
गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडील ऊर्जा खात्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राधाकृष्ण विखे हे सभापतीपदाची निवडणूक लढवावी याच मताचे होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधान परिषदेतील गटनेते माणिकराव ठाकरे हेही त्याच मताचे होते. यातूनच डॉ. गोर्‍हे यांना पहिल्या महिला सभापती करण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून शिवसेनेकडे धाडला गेला. याबाबत शिवसेनेच्या रामदास कदम व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची चर्चा झाली होती.
शिवसेना व काँग्रेसची ही योजना हाणून पाडण्याचे भाजपा व राष्ट्रवादीने ठरवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना गुरुवारी रात्री चर्चेला बोलावले. काँग्रेसचा पाठिंबा घेऊन शुक्रवारी निवडणूक लढवली तर शिवसेनेने सत्ता सोडण्याची तयारी ठेवावी, अशा स्पष्ट शब्दांत फडणवीस यांनी इशारा दिला. अगोदरच एलईडी लाईट पासून भूसंपादन विधेयकापर्यंत अनेक विषयांवर शिवसेना सातत्याने घेत असलेल्या भूमिकेमुळे आमच्या पक्षात अस्वस्थतता आहे. त्यामुळे उमेदवार मागे घेतला नाही तर आम्हाला नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री बोलल्याचे समजते.
.........................
अजितदादांची शिष्टाई?
अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधून सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ नका आणि शरद रणपिसे यांचा अर्ज मागे घ्या, अशी विनंती केल्याचे कळते. विधानसभेतील उपाध्यक्षपद भाजपा शिवसेनेला देणार आहे. त्याच धर्तीवर विधान परिषदेत आमचा सभापती झाल्यास दुसर्‍या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या काँग्रेसला उपसभापतीपद देऊ, अशी तयारी पवार यांनी चव्हाण यांच्याकडे दाखवली. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस उपसभापतीपद काँग्रेसला देण्यास विरोध करीत होता.
.......................
वांद्रेमुळे सेनेची माघार
शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. सभापतीपदावरून शिवाजीराव देशमुख यांना हटवताना भाजपाने राष्ट्रवादीला मदत करून दिलेला संदेश चुकीचा होता. सरकारमध्ये आम्ही बरोबर असताना राष्ट्रवादीला मदत करणे योग्य नव्हते. वांद्र (पूर्व) येथील विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करण्याची भाषा मुंबईतील भाजपाचे नेते करीत असल्याकडे ठाकरे यांनी फडणवीस यांचे लक्ष वेधले. वांद्रे पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेनेबरोबर राहील, असे मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांना आश्वस्त केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ठाकरे यांना दूरध्वनी करून वांद्रे (पूर्व)ची पोटनिवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट केले.
................................
आणि नीलमताईंनी अर्ज घेतला माघारी
विधान भवनात महसूलमंत्री एकनाथ खडसे, पर्यावरणमंत्री रामदास कदम व डॉ. नीलम गोर्‍हे यांची बैठक झाली. त्यामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आणि तटस्थ राहण्याचा निर्णय झाला. आता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यात लढत होईल, असे भाजपा-शिवसेनेला वाटले. परंतु पवार यांनी चव्हाण यांना उपसभापतीपदाचे आश्वासन दिले असल्याने काँग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध असतानाही रणपिसे यांचा अर्ज मागे घेतला गेला.
यामुळे आता विधानसभेत भाजपाचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपाध्यक्ष तर विधान परिषदेत राष्ट्रवादीचा सभापती तर काँग्रेसचा उपसभापती होऊ शकेल. याखेरीज वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेनेच्या उमेदवारामागे उभा राहील, अशी शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Convention-4 Lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.