"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:28 IST2025-12-15T17:22:23+5:302025-12-15T17:28:51+5:30
नगरपालिका निवडणुकीत ४७ मतांनी विजय मिळवल्यानंतर रविवारी रात्री आयोजित कार्यक्रमात मजीद यांनी 'मुस्लिम लीग'ने महिलांचा वापर मतं मिळवण्यासाठी केल्याचा आरोप केला...

"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर, सत्तारूढ सीपीआय (एम) (CPM) पक्षाचे नेते सय्यद अली मजीद यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी विजयाच्या जल्लोषाच्या कार्यक्रमात महिलांसंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आही होत आहे.
नगरपालिका निवडणुकीत ४७ मतांनी विजय मिळवल्यानंतर रविवारी रात्री आयोजित कार्यक्रमात मजीद यांनी 'मुस्लिम लीग'ने महिलांचा वापर मतं मिळवण्यासाठी केल्याचा आरोप केला. "त्यांनी (मुस्लिम लीगने) मतं मिळवण्यासाठी महिलांना दाखवले," असे विधान माजीद यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमोर केले. यावेळी महिलाही उपस्थित होत्या.
स्वपक्षीय महिलांवरही टीका -
मजीद यांनी केवळ प्रतिस्पर्ध्यांवर टीका केली नाही, तर आपल्या पक्षातील महिलांसंदर्भातही आक्षेपार्ह विधान केले. "आमच्या घरातही विवाहित महिला आहेत, पण त्या मतदानासाठी 'दाखवण्यासाठी' नाही. त्यांनी घरीच राहायला हवे. या मुळेच, लग्नाआधी खानदान आणि त्याची पार्श्वभूमी बघितली जायची," असेही ते म्हणाले.
निवडणुकीचा निकाल -
नगरपालिका निकालांसंदर्भात बोलायचे झाल्यास, हे निकाल सत्ताधारी 'लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट' (LDF) साठी मोठा धक्का ठरले आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट'ने (UDF) सहापैकी चार नगरपालिका जिंकून कोची आणि कोल्लमसारखे गड LDF कडून हिसकावून घेतले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या राजधानी तिरुअनंतपुरम नगरपालिकेत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीने अनपेक्षित विजय मिळवला आहे. १०१ जागांच्या या नगरपालिकेत एनडीएला ५०, LDF ला २९ आणि UDF ला १९ जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत.