रेल्वे विद्यापीठाची उभारणी
By Admin | Updated: February 27, 2015 02:25 IST2015-02-27T02:25:16+5:302015-02-27T02:25:16+5:30
रेल्वेला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी चालू आर्थिक वर्षात रेल्वे विद्यापीठाची उभारणी करणार

रेल्वे विद्यापीठाची उभारणी
नवी दिल्ली : रेल्वेला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी चालू आर्थिक वर्षात रेल्वे विद्यापीठाची उभारणी करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प मांडताना केली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी उपाययोजनांचे सूतोवाचही त्यांनी केले.
रेल्वेच्या मनुष्यबळाचे योग्य प्रकाराने आॅडिट करण्याची यंत्रणा उभारली जाणार असून, आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता राखली जाणार आहे. यासाठी मूल्यमापनाची एक प्रणाली निश्चित केली जाणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र प्रमुखाची नियुक्ती केली जाणार आहे. रेल्वेला प्रशिक्षित मनुष्यबळाची गरच असून, ती पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र रेल्वे विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्कील्सचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे प्रवाशांना चांगली सेवा देणे त्यांना सहज साध्य होऊ शकेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)