बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अपशब्द वापरल्यावरून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांच्यात निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान आता भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्षात झाले आहे.सुवर्ण विधानसौध पटांगणामध्ये सीटी रवी यांना अटक केल्यानंतर पोलिस त्यांना प्रथम हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. मात्र तेथे देखील हेब्बाळकर यांचे आक्रमक समर्थक मोठ्या संख्येने जमू लागल्यामुळे पोलिसांनी रवी यांना नंदगड पोलिस ठाण्यात आणि तिथून रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खानापूर पोलिस ठाण्यात हलवले. सीटी रवी यांना खानापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आल्याचे समजताच आर. अशोक, महेश, टेंगिनकाई आणि इतर नेत्यांनी खानापूर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. खानापूर येथून पोलिसांनी सी. टी. रवी यांना रामदुर्ग पोलिस ठाण्याकडे घेऊन जाण्यास सुरुवात केली असता त्यांना विरोध करत रवी यांनी वाटेतच धरणे आंदोलन केले. तरीही पोलिस त्यांना संपूर्ण रात्रभर लोकापूरसह वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात हलवत राहिले.पोलिसांनी रात्रभर मला या पोलिस ठाण्यातून त्या पोलिस ठाण्यात फिरवले असून माझी हत्या करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. सुवर्ण विधानसौध येथे माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी माझी रात्रभर फरफट केली, असा आरोप विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांनी केला.
राज्यातील महिलांचे मी प्रतिनिधित्व करत असताना अपमानजनक अपशब्द वारंवार उच्चारून सी. टी. रवी यांनी माझ्या आत्मसन्मान व आत्मविश्वासाला ठेच पोहोचवली आहे. मी खचून जाणारी, घाबरणारी महिला नाही, परंतु मी देखील कुणाची तरी आई-बहीण आहे. माझ्या बाबतीत जे घडलं ते पाहून राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांना काय वाटेल ? आमच्यासारख्या महिला लोकप्रतिनिधीच्या बाबतीत सभागृहात असा गैरप्रकार घडत असेल तर बाहेर हे महिलांविषयी काय काय बोलत असतील. याचेच मला दुःख वाटते. - लक्ष्मी हेब्बाळकर, महिला व बालकल्याण मंत्री