नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षामध्ये जबाबदारीवर भर देताना बुधवारी म्हटले की, सर्व सरचिटणीस व प्रभारींना त्यांच्या प्रभार असलेल्या राज्यांतील संघटन व निवडणूक निकालांसाठी जबाबदार धरले जाईल. काँग्रेस यापुढेही कठोर निर्णय घेत राहणार आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या नवीन मुख्यालयात पक्ष सरचिटणीस व प्रदेश प्रभारींच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस अध्यक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा हवाला देऊन म्हटले आहे की, देशाच्या राजधानीत काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आले पाहिजे.
या बैठकीत खरगे यांच्यासमवेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, सरचिटणीस प्रियांका गांधी व अनेक अनेक सरचिटणीस उपस्थित होते.
अडचणीच्या काळात पक्षाबरोबर ठामपणे उभे राहणाऱ्या लोकांना पुढे आणण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. तुम्ही निवडणूक निकालांसाठी जबाबदार असाल, असे खरगे म्हणाले.
असल फिसल पडे और नकल चल पडे
खरगे म्हणाले की, अनेकदा पक्ष मजबूत करण्यासाठी गडबडीत अनेक लोकांना सहभागी करून घेतले जाते.
परंतु विचारधारेत कमजोर असणारे लोक अडचणीच्या काळात पळून जातात. असल फिसल पडे और नकल चल पडे, ही हिंदी म्हणही त्यांनी सांगून अशा लोकांपासून दूर राहावे, असे सांगितले.
सतत संघर्ष व जनआंदोलन
पुढील पाच वर्षांत आपण जनतेचे मुद्दे घेऊन सतत संघर्ष, जनआंदोलन करून मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत उतरणार आहोत, असेही खरगे म्हणाले.