होसपेट : निवडणुकीच्या वेळी देण्यात आलेल्या पाच ‘गॅरंटी’च्या वचनांची पूर्तता करण्यात आली असून, एक लाखाहून अधिक जमीन पट्टे वाटप करून सहावी ‘गॅरंटी’ही पूर्ण करण्यात आली आहे. भाजपला मात्र पैसा आणि संसाधने काही मोजक्या श्रीमंत लोकांकडे जावीत, असे वाटते तर हा पैसा गरीब जनतेपर्यंत पोहोचायला हवा, असे काँग्रेसला वाटते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते कर्नाटकात त्यांच्या पक्षाच्या सरकारच्या दोन वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
भाजप मॉडेलमध्ये रोजगार संपतो. काँग्रेस मॉडेलमध्ये रोजगार निर्माण होतो. भाजप मॉडेलमध्ये, तुम्ही आजारी पडलात तर तुम्ही कर्जात बुडता. काँग्रेस मॉडेलमध्ये, जर तुम्ही आजारी पडलात तर तुमच्या खिशात उपचारासाठी पैसे असतात, असे राहुल म्हणाले. दरम्यान, राहुल यांची ‘खटाखट अर्थव्यवस्था’ कोसळत आहे, असे भाजपने म्हटले आहे.
पत्रकारांना पकडणे हे सरकारचे प्राधान्य : काँग्रेसपहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्याऐवजी सरकारला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना पकडणे हे सरकारचे प्राधान्य असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. ‘गुजरात समाचार’ वृत्तपत्राच्या मालकांपैकी एक बाहुबली शाह यांच्याविरुद्ध ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही टीका केली.