'माझ्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा काँग्रेसच्या कार्यसमितीने साधी बैठकही बोलवली नव्हती', अशा शब्दात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेला त्यांचेच सख्खे भाऊ अभिजित मुखर्जी यांनी उत्तर दिले. काँग्रेसला अत्यंयात्रा काढायची होती, पण केजरीवाल सरकारने निर्बंध घातलेले होते, असेही ते म्हणाले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. प्रणव मुखर्जींच्या निधनानंतर काँग्रेस कार्यसमितीने बैठक बोलवण्याचे कष्ट का घेतले नाहीत? एक वरिष्ठ नेता मला म्हणाला की, राष्ट्रपतींसाठी असे केले जात नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.
अभिजित मुखर्जी काय बोलले?
"त्यांचे (माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी) कोविड काळात निधन झाले होते. त्यावेळी खूप बंधने होती, त्यामुळे लोक एकत्र येऊ शकले नाही. केजरीवाल सरकारने कुटुंबातील सदस्यांनाही भेटण्याची परवानगी दिली नव्हती. आमच्या कुटुंबातील आणि मित्रांपैकी फक्त २० जण त्यावेळी येऊ शकले", असे प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र अभिजित मुखर्जी म्हणाले.
"त्यांची अत्यंयात्रा काढण्याची काँग्रेसची इच्छा होती, पण काढता आली नाही. काँग्रेसचे नेते आले आणि भेटून गेले होते. राहुल गांधी आणि इतर नेते आले होते", असे अभिजित मुखर्जी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या आरोपावर बोलताना म्हणाले.
शर्मिष्ठा मुखर्जी काँग्रेसवर का रागावल्या?
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक पोस्ट करत म्हटले होते की, 'जेव्हा बाबाचे (प्रणव मुखर्जी) निधन झाले होते, तेव्हा काँग्रेसने शोक सभेसाठी कार्यसमितीची बोलवण्याचेही कष्ट घेतले नाही. एका काँग्रेस नेत्याने मला सांगितले की, राष्ट्रपतींसाठी असे केले जात नाही. पण हे सगळं खोटं होतं, कारण मला नंतर बाबांची डायरीतून कळलं की, के.आर. नारायणन यांच्या निधनानंतर कार्यसमितीची बैठक बोलवली गेली होती आणि बाबांकडूनच शोक संदेश तयार करून घेण्यात आला होता', असा दावा शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केला होता.