काँग्रेस खासदार तारिक अनवर यांनी रविवारी बिहारमधील कटिहारमधील मनिहारी आणि बरारी या पूरग्रस्त भागांची पाहणी केली. पाहणीदरम्यान गावकरी तारिक अनवर यांना खांद्यावर घेऊन जाताना दिसले, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा नेते शहजाद पूनावाला यांनी तारिक अनवर यांच्यावर टीका केली.
शहजाद पूनावाला यांनी निशाणा साधला आणि म्हटलं की, काँग्रेस खासदारांना पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी काही व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलची आवश्यकता आहे. पूनावाला यांनी ट्विटरवर पोस्ट करून लिहिलं की, "काँग्रेसला पूरग्रस्त भागातही व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल हवा आहे. पूरग्रस्त भागांना भेट देताना तारिक अनवर लोकांच्या खांद्यावर बसून पाहणी करत आहेत. काँग्रेस खासदार व्हीव्हीआयपी मोडमध्ये आहेत."
"कटिहारमधील पूर आपत्तीच्या काळात काँग्रेस खासदार तारिक अनवर ग्रामस्थांच्या खांद्यावरून फिरताना दिसले. काँग्रेस किती काळ गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांचा अपमान करत राहणार?" पूनावाला यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला.
"जेव्हा एका शेतकऱ्याने खर्गे यांना भेटून त्यांच्या समस्येबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांनी त्या शेतकऱ्याला निघून जाण्यास सांगितलं. काँग्रेस शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे" असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली आणि म्हटलं की, राहुल सुट्टीच्या मोडमध्ये गेले आहेत.