काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतचोरीचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत. त्यांनी आता मतचोरीचा संबंध बेरोजगारीशी जोडला आहे. बेरोजगारीवरूनभाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर तरुण आणि पोलिसांमधील संघर्ष दाखवणारा एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडिओमध्ये केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती" असं म्हटलं आहे.
राहुल यांनी ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भारतातील तरुणांसमोरील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे आणि त्याचा थेट संबंध मतचोरीशी आहे. जेव्हा एखादं सरकार जनतेचा विश्वास जिंकून सत्तेत येतं तेव्हा त्यांचं पहिलं कर्तव्य म्हणजे तरुणांना रोजगार आणि संधी उपलब्ध करून देणं. परंतु भाजपा प्रामाणिकपणे निवडणुका जिंकत नाही. ते मतं चोरून आणि संस्थांवर नियंत्रण ठेवून सत्तेत राहतात."
"तरुणांचं भविष्य अंधारात ढकललं"
बेरोजगारीवर हल्लाबोल करत राहुल गांधी पुढे म्हणाले, "बेरोजगारी ४५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. म्हणूनच नोकऱ्या कमी होत आहेत, भरती प्रक्रिया कोलमडल्या आहेत आणि तरुणांचं भविष्य अंधारात ढकललं जात आहे. म्हणूनच प्रत्येक परीक्षा पेपर फुटीच्या गोष्टींशी जोडली जाते आणि प्रत्येक भरती भ्रष्टाचाराने भरलेली असते. देशातील तरुण कठोर परिश्रम करतात, स्वप्न पाहतात आणि त्यांच्या भविष्यासाठी संघर्ष करतात. परंतु मोदी केवळ त्यांच्या स्वतःचा जनसंपर्क, सेलिब्रिटींच्या जाहिराती आणि अब्जाधीशांच्या नफ्यावर लक्ष केंद्रित करतात. तरुणांच्या आशा चिरडून टाकणं आणि त्यांना निराश करणं ही या सरकारची ओळख बनली आहे."
"नोकऱ्यांची चोरी किंवा मतचोरी सहन करणार नाही"
"परिस्थिती बदलत आहे. भारतातील तरुणांना हे समजलं आहे की, खरा लढा फक्त नोकऱ्यांसाठी नाही तर मतचोरीच्या विरोधात आहे. कारण जोपर्यंत मतचोरी होईल तोपर्यंत बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढतच राहील. तरुण आता नोकऱ्यांची चोरी किंवा मतचोरी सहन करणार नाहीत. भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.