बिहार लोकसेवा आयोगाच्या (बीपीएससी) परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या तरुणांवर बळाचा वापर करण्यात आला आहे. यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचं 'डबल इंजिन' हे तरुणांवरील डबल अत्याचाराचं प्रतीक बनलं आहे, असा आरोप त्यांनी केला. बीपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी पाटण्यात आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी रविवारी पाण्याचा मारा आणि बळाचा वापर केला.
प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. "बिहारमध्ये तीन दिवसांत दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला. परीक्षेतील भ्रष्टाचार, हेराफेरी आणि पेपरफुटी रोखणं हे सरकारचं काम आहे. पण भ्रष्टाचार थांबवण्याऐवजी विद्यार्थ्यांना आवाज उठवण्यापासून रोखलं जात आहे. या कडाक्याच्या थंडीत तरुणांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज करणं अमानवीय आहे" प्रियंका यांनी म्हटलं आहे.
आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत परीक्षा रद्द करण्याची मागणी करत गांधी मैदानाजवळ धरणं आंदोलन केलं. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही रस्ता रिकामा करण्यास नकार दिला. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना पोलिसांनी आधी पाण्याचा मारा करून जमावाला पांगवलं. याचाही फायदा झाला नाही तेव्हा लाठीचार्ज करण्यात आला, त्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत.
जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर आणि त्यांच्या पक्षाध्यक्षांसह ६००-७०० अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी अश्रुधुराचा आणि शारीरिक शक्तीचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला आणि त्यांना जबरदस्तीने रस्त्यावरून फरफटत नेलं गेलं. महिलांशी देखील यावेळी गैरवर्तन करण्यात आल्याचं सांगितलं.