Congress Mallikarjun Kharge: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ नागरिकांना प्राण गमवावे लागल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत केली जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणात सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम हल्ल्यावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठे विधान केले आहे. आमच्यासाठी देश प्रथम येतो. धर्म, जात किंवा पक्ष नंतर आहे, असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तसेच खरगे यांनी ५६ इंचाच्या छातीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
जयपूरमधील संविधान वाचवा रॅली दरम्यान मल्लिकार्जुन खरगे बोलत होते. आपण सर्वांनी देशासाठी एकता दाखवली पाहिजे. तसेच मोदी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थित राहायला हवे होते. या हल्ल्यानंतर सरकारने कोणतेही पाऊल उचलले तरी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय हितासाठी त्यांच्यासोबत उभा राहील, असेही काँग्रेस अध्यक्ष यावेळी म्हणाले.
"निष्पाप पर्यटक काश्मीर सुरक्षित आहे, काश्मीर आपले आहे, हे ऐकून देशाच्या कानाकोपऱ्यातून तिथे जातात. तिथे अशी एक वाईट घटना घडली ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला. नंतर, रुग्णालयात असलेल्या ३-४ जणांचाही मृत्यू झाला. हे घडल्यानंतर, मी बंगळुरूहून पत्रकार परिषद घेतली आणि पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावावी असे सांगितले. कारण जेव्हा देशाचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा आपण सर्वांनी एकजूट राहिले पाहिजे. आमची अशी इच्छा होती की या बैठकीत पंतप्रधानांनी त्यांच्या योजनेबद्दल सांगावे आणि लोकांकडून सूचनाही घ्याव्यात. याशिवाय, आम्ही पक्षाची बैठकही बोलावली, ज्यामध्ये आम्ही सर्वजण सरकारसोबत असल्याचा निर्णय घेण्यात आला होता," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
"आम्ही सरकारला असेही सांगितले की या कठीण काळात, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि सरकार जे काही पाऊल उचलेल त्याला पाठिंबा देऊ. पण हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की सर्व पक्षाचे लोक त्या बैठकीला गेले, पण पंतप्रधान मोदी आले नाहीत. हे लाजिरवाणे आहे. जेव्हा देशाचा स्वाभिमान दुखावला जातो तेव्हा तुम्ही बिहारमध्ये निवडणुकीसाठी भाषणे देता आणि दिल्लीत येऊ शकत नाही. दिल्ली बिहारपासून लांब आहे का? तुम्ही मोठमोठ्या गोष्टी बोलता. माझ्याकडे ५६ इंचाची छाती आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, मी लढेन, मी घरात घुसेन. अरे बाबा, निदान जर तुम्ही त्या दिवशी बिहारच्या ऐवजी आमच्या बैठकीत आला असतात तर सर्वांना कळले असते की तुमचे नियोजन काय आहे, तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला आमच्याकडून कोणती मदत हवी आहे. सर्व पक्षाचे लोक मदत करायला तयार आहेत, तरीही तुम्ही तिथे लक्ष देण्याचा प्रयत्नही केला नाही. पंतप्रधान आणि भाजपचे हे वागणं आहे," असेही खरगे म्हणाले.
"पंतप्रधान मोदींनी महागाई आणि बेरोजगारी दिली. अशा लोकांनी देशाला कमकुवत केले आहे आणि आता ५६ इंचाची छाती आकुंचन पावली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी म्हणाले होते की विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेशचे गुजरातमध्ये रूपांतर करण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते. जेव्हा जेव्हा काँग्रेस वाढते तेव्हा हे लोक तिला दाबण्याचा प्रयत्न करतात. पण आपण दडपले जाणाऱ्यांमधील नाही," असं खरगेंनी म्हटलं.