Congress on RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक क्षमतेचे कौतुक करणारी सोशल मीडियावरील पोस्ट केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर आपल्याच पक्षातील नेत्यांकडून टीका होत आहे. त्यांच्या विधानावर काँग्रेसमध्येच संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काही नेते समर्थन करत आहेत, तर काहींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी RSS ची तुलना थेट दहशतवादी संघटनेशी केली आहे.
मणिकम टागोर यांची तीव्र टीका
खासदार मणिकम टागोर यांनी दिग्विजय सिंह यांच्या विधानावर कठोर टीका केली आहे. यासोबतच त्यांनी RSS ची तुलना थेट दहशतवादी संघटना अल-कायदाशी करत या विधानाला “फेमस सेल्फ गोल” असे संबोधले.
टागोर म्हणाले, RSS द्वेषावर उभारलेली संघटना आहे. ते द्वेष पसरवतात. द्वेषातून काहीही शिकण्यासारखे नाही. अल-कायदाकडून काही शिकता येईल का? तीही द्वेषाची संघटना आहे. अशा संघटनांकडून शिकण्यासारखे काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दिग्विजय सिंह यांनी काय म्हटले होते?
दिग्विजय सिंह यांनी 1990 च्या दशकातील एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये गुजरातमधील एका कार्यक्रमात तरुणपणीचे नरेंद्र मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या शेजारी जमिनीवर बसलेले दिसतात. या फोटोसोबत दिग्विजय सिंह यांनी लिहिले की, जे लोक कधी तळागाळात काम करतात, ते संघटनात्मक पदानुक्रमात वर जात मुख्यमंत्री आणि अखेरीस पंतप्रधानही बनू शकतात.
या पोस्टमध्ये त्यांनी RSS आणि जनसंघ/भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा उल्लेख केला होता. त्यांनी या पोस्टमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, जयराम रमेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच काँग्रेस व भाजपचे अधिकृत हँडल्स टॅग केले होते.
मणिकम टागोर पुढे म्हणतात, काँग्रेससारख्या संघटनेकडून शिकायला हवे, जिने लोकांना एकत्र आणले. महात्मा गांधींनी काँग्रेसला जनआंदोलन बनवले. द्वेष पसरवणाऱ्या संघटनांकडून शिकणे योग्य नाही. राहुल गांधी पूर्णपणे जनतेसोबत उभे आहेत. सरकारच्या मनमानीविरोधात लोकांसाठी लढत आहेत. आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. अशा प्रकारची विधाने राहुलजींच्या संघर्षाला मदत करत नाहीत.
काँग्रेसमध्ये दोन गट
या पोस्टनंतर राजकीय वाद पेटला आहे. भाजपकडून या मुद्द्यावर काँग्रेस व राहुल गांधींवर टीका केली जात असताना, काँग्रेसमध्येही नेते दोन गटांत विभागले गेले आहेत. दरम्यान, वाद वाढल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, त्यांनी RSS च्या संघटनात्मक रचनेचे कौतुक केले होते, विचारसरणीचे नाही. आम्ही RSS आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधकच आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Digvijay Singh's post praising RSS triggered Congress backlash. Manickam Tagore compared RSS to Al-Qaeda, criticizing Singh's remarks. Singh clarified he praised RSS structure, not ideology.
Web Summary : दिग्विजय सिंह के RSS की प्रशंसा वाले पोस्ट पर कांग्रेस में तीखी प्रतिक्रिया हुई। मणिकम टैगोर ने RSS की तुलना अल-कायदा से की और सिंह की आलोचना की। सिंह ने स्पष्ट किया कि उन्होंने RSS की संरचना की प्रशंसा की, विचारधारा की नहीं।