Congress on Election Commission of India: देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी आज(दि.१७) पत्रकार परिषदेतून काँग्रेसच्या मत चोरी आणि बिहारमधील SIR बाबत केलेल्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, 'मतदार यादीतील विशेष सखोल सुधारणा (SIR) चा उद्देश सर्व त्रुटी दूर करणे आहे, परंतु काही पक्ष यावर दिशाभूल करणारा प्रचार करत आहेत. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे.' यावर आता काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधत म्हटले की, "आम्ही कोणत्याही मतदाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत नाही आहोत, तर पंतप्रधान मोदी तुमच्या नाजूक खांद्यावर बंदूक ठेवून लोकशाहीची हत्या करत आहेत. आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी घेतलेली पत्रकार परिषद ऐकल्यानंतर असे वाटले की, ही भाजपची स्क्रिप्ट आहे," अशी टीका खेरा यांनी केली.
ते पुढे म्हणतात, "आजच्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता म्हणाले की, 'एका व्यक्तीची अनेक ठिकाणी मतदार यादीत नोंद असेल, तर काय झाले? तो फक्त एकदाच मतदान करेल'. आता आमचा थेट प्रश्न असा आहे की, गुप्ताजी तुम्ही न्यायालयात हे लेखी स्वरुपात देण्यास तयार आहात का? सीसीटीव्ही फुटेज गोपनीयतेचे उल्लंघन करत असेल, तर रेकॉर्ड का केले जाते? तुमचे भाजपचे एजंट बनण्याचे वय नाही. तुम्ही कितीही निवडणुका चोरल्या तरी लवकरच नवीन सरकार येईल," असा दावाही खेरा यांनी केला.
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर