काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्या चर्चा
By Admin | Updated: August 18, 2014 02:50 IST2014-08-18T02:50:04+5:302014-08-18T02:50:04+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसला जुन्या फार्म्युल्यानुसार ११४ जागा दिल्या जाणार होत्या, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे बदलेली वस्तुस्थिती पाहता राष्ट्रवादीने जागा वाढवून मागितल्या आहेत

काँग्रेस-राष्ट्रवादीची उद्या चर्चा
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपाबाबत येत्या मंगळवारी (दि. १९) रोजी चर्चा करणार आहे. जागावाटपाच्या नव्या फार्म्युल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सरचिटणीस प्रफुल्ल पटेल तसेच काँग्रेसच्यावतीने माजी संरक्षणमंत्री ए.के. अॅन्टनी आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे चर्चा करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसला जुन्या फार्म्युल्यानुसार ११४ जागा दिल्या जाणार होत्या, मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे बदलेली वस्तुस्थिती पाहता राष्ट्रवादीने जागा वाढवून मागितल्या आहेत. राष्ट्रवादीने १४४ जागांसाठी जोर लावला असला तरी हा पक्ष १३० जागांवर सहमत होईल, असे मानले जाते. सध्या संपुआचा घटक नसलेल्या काही छोट्या पक्षांना उर्वरित जागा दिल्या जाऊ शकतात. अन्य पक्षांना सामावून घेतानाच रालोआतील घटक पक्षांमधील असंतोष धर्मनिरपेक्ष शक्तींना बळकटी देणारा ठरू शकतो, असा राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या समीक्षेचा कल असून त्याबाबत काँग्रेसला माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, हरियाणात ओमप्रकाश चौटाला यांचा आयएनएलडी हा पक्ष दुसऱ्या स्थानी आल्यास काँग्रेसची तिसऱ्या स्थानी पिछेहाट होईल. भाजपाने कुलदीप बिश्नोई यांच्या हरियाणा जनहित काँग्रेसशी युतीचे प्रयत्न चालविले आहेत.
निवडणुकीचा कल पाहून काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपाकडे धाव घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बीरेंदरसिंग, अवतावरसिंग भदाना यांच्यासारख्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याची तयारी केली आहे.