Congress MP Rakesh Rathore Arrested : उत्तर प्रदेशातील सीतापूरचे काँग्रेसखासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. राकेश राठोड यांच्यावर महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. दरम्यान, गुरुवारी राकेश राठोड आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत होते, त्याचवेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.
१७ जानेवारीला एका महिलेने खासदार राकेश राठोड यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच, याप्रकरणी काल उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने राकेश राठोड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायमूर्ती राजेश चौहान यांनी राकेश राठोड यांना दोन आठवड्यांत आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते.
खासदार राकेश राठोड हे आत्मसमर्पण करणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, खासदार राकेश राठोड गेल्या ४ वर्षांपासून लग्नाच्या बहाण्याने आणि राजकीय कारकिर्दीत मदत देण्याचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करत होते. तसेच, त्यांच्याकडून तिला सतत धमक्या दिल्या जात होत्या.
याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कोतवालीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडितेने कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक पुरावेही गोळा केले आहेत. याशिवाय, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिचा जबाबही न्यायालयासमोर नोंदवण्यात आला आहे.