Congress Meeting : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी(2 मे) सायंकाळी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची (CWC) बैठक झाली. बैठकीत खरगेंनी पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नसल्याची टीका केली. पण, अशा कठीण परिस्थितीत काँग्रेस पक्ष सरकारच्या पाठीशी उभा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सीडब्ल्यूसीच्या बैठकीत खरगे म्हणाले की, पहलगाम हल्ल्याबाबत मोदी सरकारचे धोरण स्पष्ट नाही. पण, विरोधी पक्ष या मुद्द्यावर सरकारच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे. विरोधी पक्ष सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. देशाच्या एकता आणि अखंडतेला बाधा पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी केले. हल्ल्यानंतर राहुल गांधींनी कानपूरमध्ये शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याचे खरगेंनी सांगितले. तसेच, त्यांनी सरकारकडे मृतांना शहीद दर्जा देण्याची मागणीही केली आहे.
जातीय जनगणनेवर खरगे काय म्हणाले?केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यामुळे खरगेंनी राहुल गांधींचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, राहुल गांधींनी हा मुद्दा सतत उपस्थित करून सरकारला जातीय जनगणनेचा निर्णय घेण्यास भाग पाडले. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून त्यांनी याला एका शक्तिशाली मोहिमेत रूपांतरित केले. राहुल गांधींनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, जर आपण लोकांचे प्रश्न खरेपणाने मांडले, तर सरकारला झुकावे लागेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
बैठकीला कोण कोण उपस्थित होते?या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन, अजय कुमार लल्लू, हरीश रावत, सुखजिंदरसिंग रंधावा, अंबिका सोनी, बीके हरिप्रसाद, पवन खेरा, माणिकराव ठाकरे, सलमान खुर्शीद, के सुरेश, प्रियंका गांधी, सचिन कुमार तारिक, मीरा गुरिश कुमार पायलट, मीना कुमार, अनंत कुमार, अभिषेक मनुसिंघवी, केसी वेणुगोपाल, नासिर हुसेन, कन्हैया कुमार आणि चरणजीत सिंग चन्नी उपस्थित होते.