काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी कर्नाटकातील म्हैसूर येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून मोदींवर निशाणा साधला आहे. "पंतप्रधानांनी ४२ देशांचा दौरा केला आहे, परंतु एकदाही मणिपूरला गेले नाहीत" असं म्हटलं आहे. मणिपूरमध्ये गेल्या एक वर्षापासून जातीय हिंसाचार आणि अस्थिरता पाहायला मिळत आहे, ज्यावर विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
"देशाच्या ईशान्येकडील राज्य मणिपूर एका वर्षापेक्षा जास्त काळ हिंसाचाराचा सामना करत आहे, परंतु पंतप्रधानांना तिथे जाऊन लोकांचं दुःख समजून घेण्याची आवश्यकता वाटत नाही. ४२ देश फिरून आले, पण मणिपूरला भेट देणं गरजेचं वाटलं नाही. मणिपूर भारताचा भाग नाही का?" असं म्हणत खरगेंनी खोचक सवाल विचारला आहे.
"भाजपा आणि RSS ला संविधान बदलायचंय"
काँग्रेस अध्यक्षांनी भाजपा आणि आरएसएसवर संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही केला. "भाजपा आणि आरएसएस संविधान बदलू इच्छितात, परंतु देशातील जनता त्यांना तसं करू देणार नाही" असं म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकांना संविधानाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत जागरूक राहण्याचं आवाहनही केलं.
"मोदींच्या भाजपामध्ये लोक फक्त बोलतात"
खर्गे यांनी काँग्रेस आणि भाजपाची तुलना करत म्हटलं की, "काँग्रेस पक्षात लोक काम करतात, तर मोदींच्या भाजपामध्ये लोक फक्त बोलतात. काँग्रेसने नेहमीच लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं आहे आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवलं आहे. भाजपा म्हणतं की, कर्नाटक सरकार कंगाल झालं आहे, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. सिद्धरामय्या सरकार राज्याला चांगल्या दिशेने घेऊन जात आहे आणि भाजपाचा हा आरोप निराधार आहे."