दहशतवादाविरोधातील भारत सरकारची भूमिका जगासमोर स्पष्टपणे मांडण्यासाठी केंद्र सरकारने काही प्रमुख देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचेशशी थरूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या शिष्टमंडळातील शशी थरूर यांच्या समावेशावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यावर आता शशी थरूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जेव्हा देशाला माझी गरज असेल, तेव्हा मी नेहमी उपलब्ध असेन, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या शिष्टमंडळांपैकी एकाचं नेतृत्व शशी थरूर करणार आहेत.
याबाबत शशी थरूर म्हणाले की, माझ्या पक्षाच्या नेतृत्वाला माझी पात्रता आणि माझ्यामधील वैगुण्यांबाबत बोलण्याचा हक्क आहे. त्याबाबत मी फार काही बोलणार नाही. माझ्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तिचा मी सन्मान करतो. तसेच ही जबाबदारी मी माझ्या दीर्घ कारकीर्दीमध्ये माझ्यावर सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण केली आहे. मग ती जबाबदारी संयुक्त राष्ट्रांमधील असो वा काँग्रेस पक्षामधील असो, ती पूर्ण केली आहे.
शशी थरूर यांनी पुढे सांगितले की, विविध मुद्द्यांवर सोमवारी आणि मंगळवारी आमच्या संसदीय स्थायी समितीची बैठक आहे. दोन दिवसांपूर्वी या शिष्टमंडळाबाबत मला एक फोन आला होता. त्याची माहिती मी पक्षाला दिली होती. संसदीय कार्य मंत्र्यांना मी विरोधी पक्षांच्या नेतृत्वाशी बोलण्यास सांगितलं होतं. त्यावर त्यांनी आपण संवास साधू असं सांगितलं होतं. हे शिष्टमंडळ मला फार उपयुक्त वाटलं. देशाने असा महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकजूट झालं पाहिजे, असे आवाहानही त्यांनी केलं.