नवी दिल्ली : कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष घातले होते व प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देऊन एकूण २०० कोटी रुपये देण्याची तयारी ठेवली होती, असा घणाघाती आरोप काँग्रेसने शनिवारी केला. भाजपाचे नेते बी. एस. येदियुरप्पा यांची आमदारांना पैसे देण्याबाबतची ध्वनिफीत उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.काँग्रेसचे सरचिटणीस व कर्नाटकचे प्रभारी खा. के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले की, कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या प्रयत्नांचा पर्दाफाश झाला आहे. येडियुरप्पांनी प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्यांनी मोदी-शहा यांचा हवाला दिला आहे.पंतप्रधान काय कारवाई करणार?पंतप्रधान या प्रकरणात काय कारवाई करणार, असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. आम्ही संसदेत सोमवारी हा मुद्दा उपस्थित करणार आहोत, असेही ते म्हणाले. मोदी, शहा व येडियुरप्पा या त्रिकुटाने संविधान व लोकशाही धोक्यात आणली आहे. आता सीबीआय व ईडी येडियुरप्पांवर कधी छापे घालणार आहे, असा सवालही त्यांनी केला.भाजपा किती खालच्या स्तरावर उतरली आहे? आमदारांना देण्यासाठी एवढे कोट्यवधी रुपये आणले कोठून? हे पहिल्यांदाच होत नाही. भाजपाने यापूर्वीही आमदारांचा घोडेबाजार केला आहे. या राजकारणाचा करावा तेवढा निषेध थोडा आहे, असेही वेणुगोपाल म्हणाले. मात्र ही ध्वनिफीत बनावट आहे व मुख्यमंत्री वाटेल ते आरोप करीत आहेत, असे येडियुप्पांनी म्हटले आहे.
कर्नाटक सरकार पाडण्यासाठी २०० कोटी रुपयांचे आमिष, काँग्रेसचा भाजपावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 07:49 IST